
सणसवाडीतील कंपन्यांकडे खंडणीची मागणी
शिक्रापूर, ता. १५ : ‘कॉन्ट्रॅक्ट द्या, नाही तर दर महिन्याला मला व माझ्या संघटनेच्या राष्ट्रीय अध्यक्षाला पैसे द्या,’ असे म्हणून खंडणी मागणाऱ्या मानव विकास परिषद संघटनेचा जिल्हा उपाध्यक्ष नीलेश दरेकर याच्यावर सणसवाडी (ता. शिरूर) येथील दोन कंपन्यांच्या तक्रारीवरून खंडणीचा गुन्हा दाखल केला.
याबाबत शिक्रापूरचे पोलिस निरीक्षक प्रमोद क्षीरसागर यांनी माहिती दिली की, आरोपींनी सणसवाडी येथील अॅक्टीव्ह क्रोमवेल एक्झॉस्ट प्रा.लि. व यझाटा इस्टेट प्रोजेक्ट कंपनीकडे कंपनी जागा एनए असल्याचे पुरावे, पीएमआरडीए परवानगी कागदपत्रे-बांधकाम परवानगी व मंजूर बांधकाम, अग्निशामन विभागाची ना हरकत, महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या परवानग्या आदी मागविले. हे सर्व वेळेत न दिल्यास पीएमआरडीए कार्यालयापुढे आंदोलनाचा इशारा दिला. तसेच, ‘अग्नीविरोधी यंत्रणेच्या कामाचा ठेका किंमत जास्त असली; तरी आम्हालाच द्या, दोन्ही ठिकाणी दर महिन्याला मला व माझ्या संघटनेच्या राष्ट्रीय अध्यक्षाला पैसे द्या,’ अशी मागणी करत जिवे मारण्याच्या धमकीसह खंडणी मागितली. याबाबत ‘यझाटा’चे मालक इराझ फरिदानी व ‘अॅक्टीव्ह क्रोमवेल एक्झॉस्ट’चे प्रवीण बडदे यांच्या फिर्यादीवरून नीलेश दरेकर व संघटनेचा राष्ट्रीय अध्यक्ष अफसर शेख या दोघांच्या विरोधात दोन स्वतंत्र खंडणीचे गुन्हे दाखल केले. दरेकर याला अटक केली असून, शेख याला पकडण्यासाठी एक पथक रवाना केले.
तक्रार करण्याचे आवाहन
शिक्रापूर-सणसवाडी परिसरातील कंपन्यांमध्ये अनेकजण आपली दहशत करून कंपन्यांचे ठेके थेटपणे स्वत: घेत उद्योगांना दहशतीत ठेवण्याचे प्रकार करीत आहेत. अशा काही स्थानिक व बाहेरील व्यक्तींची नावे शिक्रापूर पोलिसांनी संकलित केलेली आहेत. मात्र, फक्त तक्रार दाखल करण्याची वा पोलिसांना कळविण्याची (९०७७१००१००) आम्ही वाट पाहत असून तक्रारकर्त्यांची नावे गुप्त ठेवण्याबरोबरच ठोस कारवाईचीही ग्वाही शिक्रापूर पोलिसांनी दिली.