बांदल करणार उद्या भूमिका जाहीर | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

बांदल करणार उद्या भूमिका जाहीर
बांदल करणार उद्या भूमिका जाहीर

बांदल करणार उद्या भूमिका जाहीर

sakal_logo
By

शिक्रापूर, ता.२४ : पुणे जिल्हा परिषदेच्या बांधकाम समितीचे माजी सभापती मंगलदास बांदल रविवारी (ता.२६) शिरूरमध्ये आपल्यावरील दाखल गुन्हे, त्यात झालेला राजकीय हस्तक्षेप, सध्याची व भविष्यातील त्यांची राजकीय भूमिका याबद्दल बोलणार असल्याची माहिती बांदल यांनी दिली.
अडीच वर्षांपूर्वी राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेश उपाध्यक्षपदापर्यंत गेलेल्या व राष्ट्रवादीकडून थेट शिरूर लोकसभा मतदारसंघाकडून इच्छुक राहिलेल्या बांदलांना राष्ट्रवादीने पक्षविरोधी कारवायांचे कारण सांगून पक्षातून बाहेर काढले होते. त्यानंतर २२ महिन्यांपूर्वी त्यांच्यावर पुण्यातील शिवाजीराव भोसले सहकारी बॅंकेच्या फसवणूकीसह खंडणीचे गुन्हेही दाखल झाले होते. याच सर्व गुन्ह्यांमधून त्यांची मागील आठवड्यात उच्च न्यायालयाने जामिनावर मुक्तता केल्यानंतर ते पुन्हा राजकीय सक्रिय होत आहेत. याच अनुषंगाने त्यांच्याशी संपर्क केला असता त्यांनी सांगितले की, शिरूर तालुक्यातील जे काही राजकीय नेते मला गेली कित्येक वर्षे तुरुंगात पाठविण्यासाठी आतूर होते त्यांची इच्छा एकदाची पूर्ण झाली. ''एक डाव भूताचा'' या निमित्ताने पूर्णही झाला. आता दुसरा डाव देवाचा सुरू होईल आणि देवाच्या काठीला आवाज नसतो हे त्यांनी आता लक्षात ठेवावे, असे म्हणत त्यांनी सांगितले.


नाव घेवून बोलणार
रविवारपर्यंत कुणाचेही नाव घेणार नाही, मात्र रविवारी ज्यांनी-ज्यांनी माझ्याविरोधात ज्या काही टोकाच्या प्रतिष्ठा पणाला लावल्या. त्या सर्वांची नावे घेऊन आपण बोलणार आहे. त्यांचे काळे उद्योगही आपण चव्हाट्यावर आणणार आहे. स्वत: एकदम स्वच्छ आणि इतर जग मात्र गुन्हेगार असे म्हणणाऱ्यांची काळी उद्योगशैली कशी असते ते आपण उघड करणार आहे. राजकीय हिसाब जरूर पूर्ण करू, असे मंगलदास बांदल यांनी सांगितले.
02646