‘पीएमआरडीए’च्या गुगल सर्व्हेला विरोध | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

‘पीएमआरडीए’च्या गुगल सर्व्हेला विरोध
‘पीएमआरडीए’च्या गुगल सर्व्हेला विरोध

‘पीएमआरडीए’च्या गुगल सर्व्हेला विरोध

sakal_logo
By

शिक्रापूर, ता. २८ : ‘पीएमआरडीए’ने प्रारूप विकास आराखडा गुगल सर्व्हेच्या आधाराने केल्याने शिरूरमध्ये ३००० मीटरपर्यंतची पूर नियंत्रण रेषा, चुकीचा ग्रीन बेल्ट आणि शेकडो शेतकऱ्यांच्या शेताच्या मधोमधूनच मोठाले रस्ते टाकले गेलेत. याबाबत वारंवर विनंती करूनही दखल घेत नसल्याने आंदोलन सुरू करण्याचा इशारा पुणे जिल्हा विकास मंचने जिल्हाधिकारी व ‘पीएमआरडीए’च्या आयुक्तांना दिला.
‘पीएमआरडीए’ने प्रारूप विकास आराखडा ऑगस्ट २०२१ मध्ये प्रसिद्ध केला व पुढील ३० दिवसांत सूचना व हरकती मागविल्या होत्या. या आराखड्यात खुपच मोठ्या प्रमाणात त्रुटी असल्याने हजारोंच्या संख्येने नागरीकांनी आपल्या हरकती नोंदवल्या होत्या. विकास आराखडा प्रसिद्ध होण्यापूर्वी पुणे महापालिका हद्दीपासून १० किलोमीटर म्हणजेच केसनंद, वाडेबोल्हाई, शिरसवडी अशी हवेलीतील अनेक गावे तसेच रांजणगाव एमआयडीसीलगतच्या ५ किलोमीटर म्हणजेच सोनेसांगवी, ढोकसांगवी, बाभुळसर यासारख्या शिरुरमधील गावात फार मोठ्या प्रमाणात अनेकांनी गुंठेवारीत आपली घरे थाटलेली आहेत. या सर्वांना नवीन विकास आराखड्यात रहिवासी झोन अपेक्षित होता व तसे अर्जही सर्वांनी केले होते. प्रत्यक्षात ‘पीएमआरडीए’ने हा आराखडापूर्व सर्व्हे प्रत्यक्ष न घेता गुगलच्या आधारे केला. त्यामुळे अनेकांच्या सध्याच्या घरावरून मोठाले रस्ते नियोजित केले आहेत.
याबाबत पीएमआरडीएकडे वारंवार तक्रारी करूनही काहीच होत नसल्याने पुणे जिल्हा विकास मंचने सर्व तक्रारदार शेतकरी, घरमालक, शाळा-महाविद्यालयाचे संस्थाचालक, कामगारांची तक्रारसुची जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख व ‘पीएमआरडीए’चे आयुक्त राहुल महिवाल आदींना दिली. तत्काळ आराखडा दुरुस्तीचे सूचनापत्र जारी न झाल्यास जिल्हाधिकारी व पीएमआरडीए कार्यालयांपुढे आंदोलन करणार असल्याचा इशारा मंचचे अध्यक्ष सदाशिव पवार, कार्याध्यक्ष डॉ. ज्ञानेश्वर मंडलिक, सचिव कांतिलाल गवारे, पी. के. गव्हाणे, खजिनदार श्रीपत नवले यांनी दिला.
दरम्यान, ‘पीएमआरडीए’कडून होत असलेल्या एकतर्फी निर्णय लादण्याच्या भूमिकेच्या विरोधात पुण्यात आंदोलने करणारच आहोत, शिवाय नुकतेच सुरू झालेल्या अर्थसंकल्पीय अधिवेशनातही आंदोलने करण्याचे आमचे नियोजन असल्याचे पवार यांनी सांगितले.

शिरूरमध्ये खासगी एजन्सी
शिरूरच्या घोडनदीचा सर्व्हे एका खासगी एजन्सीला दिल्याने तिथे सरासरी १ हजार ते ३ हजार फूट एवढी पूररेषा निर्धारित झाली आहे. सर्व परवानग्या घेऊन सुरू असलेल्या एका संपूर्ण शाळेला तर थेट पूररेषेत या एजन्सीने ओढले आहे, तर एका शाळेच्या क्रिडांगणाशेजारीच आणखी एका क्रीडांगण नियोजित करून अनेक शेतांच्या बरोबर मध्यभागातूनच मोठाले रस्ते नियोजित केले आहेत.