पाटबंधारे विभागाचे पत्रच नाही! | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

पाटबंधारे विभागाचे पत्रच नाही!
पाटबंधारे विभागाचे पत्रच नाही!

पाटबंधारे विभागाचे पत्रच नाही!

sakal_logo
By

शिक्रापूर, ता. १४ : थिटेवाडी (ता. शिरूर) बंधाऱ्यातील पाणी १ मार्चनंतर उचलू (उचल पद्धतीने) नये, तसे होत असेल तर वीजजोड थेट तोडण्यात यावे, असे कुठलेही पत्र वा आदेश गेल्या १८ वर्षात पाटबंधारे खात्याने ना महावितरणला दिले, ना शिरूर तहसीलदारांना दिले. पर्यायाने तब्बल ०.३७ टीएमसी पाण्याचा अंदाधुंद बाजारच पाटबंधारे खात्याने केल्याचे उघड झाले असून, चालू वर्षीही असे कुठलेच आदेश काढले नसून, आजही बेकायदेशीरपणे पाणीचोरी सुरू आहे.
लाभक्षेत्रात नसतानाही पाबळ (ता. शिरूर) येथून थेटपणे ३०० मोटारींद्वारे पाणीचोरी सुरू असताना पिण्यासाठी केंदूर ग्रामस्थांना पाणी नाकारल्याने ग्रामस्थ संतप्त आहेत. १ मार्चनंतर उचलपाण्याला परवानगी नसल्याने तसे आपण महावितरणला तोंडी कळविल्याचे पाटबंधारे खात्याचे सहायक कार्यकारी अभियंता एस. व्ही. डिगीकर यांनी सांगितले होते. याबाबत शिक्रापूरचे उपकार्यकारी अभियंता नितीन महाजन यांनी सांगितले की, आमचे शिक्रापूर कार्यालयाकडे असे कुठलेही पत्र आजपर्यंत आलेले नाही. या शिवाय पाटबंधारे विभागाकडून यापूर्वीही कधी अशा पद्धतीचे कुठलेच पत्र आल्याचे आम्हाला दिसत नाही. फक्त पाणीटंचाईवेळी थेट तहसीलदारांचे पत्र आम्हाला येते आणि आम्ही कारवाई करतो.
पाबळ शाखेचे शाखा अभियंता श्रीकांत ताटीकोंडा यांनी सांगितले की, आम्हालाही थिटेवाडीतील पाणी निर्बंधांबाबत कुठलेच पत्र वा तोंडी सूचना पाटबंधारे खात्याकडून आलेल्या नाहीत. पत्र मिळाल्यास तत्काळ कारवाई सुरू होतील.
उन्हाळ्याच्या तोंडावर बेकायदेशीर पाणी कुणी कुठूनही घेत असेल वा कुणी पाणीचोरी करीत असेल; तर त्यांची तक्रार आमच्याकडे येऊद्या तत्काळ पाणीचोरीचे गुन्हे दाखल करू, असे पाबळ पोलिसांनी सांगितले. उन्हाळी स्थितीत पाणी उचलण्यासाठी बेकायदेशीर वीजचोरीबद्दलही अनेक तक्रारी येतात. त्याबद्दलही आम्ही नियमानुसार गुन्हे दाखल करणार असल्याचेही त्यांनी सांगितले.
तब्बल १८ वर्षे लाभक्षेत्रातील एका मोठ्या गावाला पिण्याच्या पाण्याला नाही म्हणणे आणि बेकायदा उचल पाणी उचलू देणे, किती गंभीर पद्धतीने चालू आहे, याचे चित्रीकरण केंदूर ग्रामस्थांनी केले आहे. हा प्रश्न विधानसभेत उपस्थित होण्यासाठीही काही शेतकरी तयारीत आहेत.