शैक्षणिक प्रवेशासाठीचे 
दाखले आताच काढा!

शैक्षणिक प्रवेशासाठीचे दाखले आताच काढा!

शिक्रापूर, ता. १ : शैक्षणिकदृष्ट्या अत्यंत महत्त्वाचे महसूल विभागाचे काही दाखले व प्रमाणपत्रे दरवर्षी शाळा-महाविद्यालयांच्या प्रवेशावेळी विद्यार्थी-पालकांना आवश्यक असतात. ही बाब नेमकी प्रवेशावेळीच सर्वांच्या लक्षात येते आणि सर्वांची गर्दी तहसील कार्यालयातील सेतू केंद्रे, महा-ई-सेवा व महासेवा केंद्रांमध्ये होते. परिणाम: दाखले-मागणी जंबो स्वरूपात येते आणि महाऑनलाईनचे संकेतस्थळ संथ होणे किंवा अ‍ॅक्सेसच न मिळणे, असे परिणाम होतात. त्यातून दाखल्यांअभावी अनेकांना शाळा-महाविद्यालय प्रवेशामध्ये अडचणी येतात. त्यामुळे शाळा-महाविद्यालये सुरू होण्यापूर्वी सर्व आवश्यक दाखल्यांसाठी अर्ज करा.

शाळा-महाविद्यालयांसाठी आवश्यक दाखले
१. उत्पन्न दाखला
२. रहिवासी दाखला
३. वय-अधिवास (डोमिसाईल) दाखला
४. शेतकरी दाखला
५. अल्पभूधारक दाखला
६. जात-प्रमाणपत्र
७. नॉनक्रिमीलेअर दाखला
८. आर्थिकदृष्ट्या मागास प्रवर्गाचे प्रमाणपत्र (EVS)


दाखले काढून घेण्यासाठीची ठिकाणे
ऑफलाईन : थेट तहसील कार्यालयातील सेतू कार्यालय
ऑनलाइन : गावागावातील सर्व सेतू केंद्रे, महा-ई-सेवा केंद्र तसेच महासेवा केंद्र

दाखले मिळण्याची दिवस मर्यादा :
अर्ज दाखल केल्यावर दहाच दिवसांत मिळणारे दाखले : उत्पन्न, रहिवासी, वय, शेतकरी, अल्प-भूधारक, आर्थिकदृष्ट्या मागास प्रवर्ग प्रमाणपत्र.
अर्ज दाखल केल्यावर ४५ दिवसांत मिळणारे दाखले : जात-प्रमाणपत्र, नॉनक्रिमीलेअर दाखला.

दाखल्यांना वर्षभराची मुदत
वरील सर्व दाखल्यांची व्हॅलिडीटी मुदत ही १ एप्रिल ते ३१ मार्च अशी पुढील एक वर्षभर असते. १ एप्रिलपासून पुढे कधीही वरील दाखले-प्रमाणपत्रे काढली की, त्यांची व्हॅलिडीटी त्या वर्षाच्या ३१ मार्चपर्यंत असते. पर्यायाने शाळा-महाविद्यालये सुरू होण्याच्या आधी तब्बल अडीच महिने एवढा मुबलक वेळ वरील सर्व दाखले काढण्यासाठी पालक-विद्यार्थ्यांसाठी उपलब्ध असतो. केवळ वैद्यकीय दाखलेच तत्काळ दिले जाणार असून, अन्य कुठलाही दाखला हा तत्काळ दिला जाणार नसून, तो विहित कालावधीतच (प्रथम येणाराच प्रथम या प्राधान्यक्रमानुसार) मिळणार आहे, अशी माहिती शिरूरचे सेतू चालक शंकर जामदार यांनी दिली.

शाळा-महाविद्यालये सुरू होण्यापूर्वी सर्व आवश्यक दाखल्यांसाठी अर्ज करा आणि आवश्यक दाखल्यांसह निर्धास्तपणे प्रवेश प्रक्रीया पूर्ण करा.
- बाळासाहेब म्हस्के, तहसीलदार, शिरूर

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com