महायुतीच्या पदाधिकाऱ्यांना झटका

महायुतीच्या पदाधिकाऱ्यांना झटका

शिक्रापूर, ता. ५ ः शिरूर व हवेली या दोन्ही तालुक्यांतून सुमारे साडेचार लाख मतदान असताना सुमारे दोन लाख मतदारांनी मतदानच केले नाही. तरीही झालेल्या २ लाख ४९ हजार ९७९ मतदानापैकी तब्बल १ लाख २८ हजार मते खासदार डॉ. अमोल कोल्हेंना तर १ लाख २८३ मते शिवाजीराव आढळराव पाटील यांना मिळाली. शिरूर-हवेलीतील बहुतेक सर्वच प्रमुख गावांमधून कोल्हे यांनी मताधिक्य मिळविल्याने ही निवडणूक महायुतीच्या सर्वच प्रमुख पदाधिकाऱ्यांना झटका देणारी ठरली आहे.

राष्ट्रवादी पक्ष फुटीनंतर शिरूरचे खासदार डॉ. अमोल कोल्हे व शिरूर-हवेलीचे आमदार अशोक पवार या दोघांनीही शरद पवार यांच्यासोबत राहण्याचा निर्णय घेतला. दोघांच्या दृष्टीने हा निर्णय घातक ठरेल असे बोलले गेले. प्रत्यक्षात मात्र लोकसभा निवडणुकीत शिरूर-हवेलीतील बहुतेक प्रत्येक गावांमध्ये तुतारी जोरात चालल्याने डॉ. अमोल कोल्हे विजयी झाले. याशिवाय घोडगंगा कारखान्यामुळे आणि अनेक कार्यकर्ते तुटल्याने आमदार अशोक पवारांबद्दल नकारात्मक बोलले जात होते तेही यानिमित्ताने पुसले गेले. अशोक पवारांसाठी विधानसभा-२०२४ला आमदारकीची हॅटट्रिक होईल असा शुभसंकेत लोकसभा निवडणूक देवून गेली.
पक्ष फुटीनंतर शरद पवार यांची साथ सोडण्याचा निर्णय शिरूर शहरापासून ते पुढे शिक्रापूर, सणसवाडी, कोरेगाव भीमा, तळेगाव-ढमढेरे, मांडवगण, न्हावरा, निमोणे आदी मोठ्या गावांतील प्रमुख पदाधिकाऱ्यांनी घेतल्याने यावेळीचे मतदान कोल्हेंच्या विरोधात जाईल अशी स्थिती होती. या शिवाय जिल्हा परिषद, पंचायत समिती, बाजार समिती आदी राजकीय प्रमुख संस्थांमधील राष्ट्रवादीचे अनेक विद्यमान पदाधिकारी कोल्हेंच्या विरोधात असताना यातील अनेक पदाधिकाऱ्यांच्या गावात कोल्हेंनी आघाडी घेतल्याचे चित्र या राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाच्या
पदाधिकाऱ्यांसाठी धक्कादायक आहे. राष्ट्रवादीचे शिरूर-हवेलीचे तालुकाध्यक्ष रवींद्र काळे, आंबेगाव-शिरूरचे तालुकाध्यक्ष मानसिंग पाचुंदकर, महिला आघाडीच्या जिल्हाध्यक्षा मोनिका हरगुडे, जिल्हा परिषद सदस्या कुसुम मांढरे आणि विशेष म्हणजे ऐन निवडणुकीत कोल्हेंच्या विरोधात प्रचारासाठी मैदानात उतरलेले माजी सभापती मंगलदास बांदल आदींच्या गावातून महायुतीच्या शिवाजीराव आढळराव पाटील यांची पिछाडी या सर्वांसाठी मोठा झटकाच म्हणता येणार आहे.
मागील निवडणुकीत कोल्हेंना शिरूर-हवेलीने २६ हजार ११५ एवढे मताधिक्य दिले होते. यावेळी यात आणखी एका हजार ७७४ एवढ्या मतांची भर पडली. दिवंगत माजी आमदार बाबूराव पाचर्णे यांच्यानंतर शिरूर-हवेलीतून भाजपकडून प्रदीप कंद हे प्रमुख इच्छुक समजले जातात. तर त्यांच्याबरोबरच जयश्री पलांडे, दादा पाटील फराटे यांनीही मतदार संघ बांधण्याला सुरुवात केली आहे. या तिघांचाही लोकसभा निवडणुकीत कुठलाच करिष्मा दिसला नाही. वाघोलीतील साधारण साडेचार हजार आढळरावांच्या मताधिक्यावर कंद किंवा पलांडे दावा करीत असतील तर तो फोल असून तिथे वाघोलीचे स्थानिक नेते यावेळी आढळरावांच्या सोबत असल्याने वाघोली प्लस राहिली.
शिवसेनेचे (उबाठा) जिल्हाध्यक्ष माऊली कटके हेही विधानसभेसाठी इच्छुक असले तरी त्यांच्या गावातच कोल्हेंना फटका बसल्याने कटकेंसाठीही ही निवडणूक चिंतेची ठरलेली आहे. शिवसेनेचा फारसा प्रभाव या मतदार संघात जाणवत नसला आणि मनसे फॅक्टरही तितका सक्रिय दिसला नसल्याचा फटका आढळरावांना बसला. शिरूर-हवेली हा मतदार संघ राष्ट्रवादीकडे असल्याने अजित पवारांकडे अनेकांनी विधानसभेसाठी फिल्डींग होती. परंतु त्या सर्वांच्या आशेवर पाणी फिरविणारी ही निवडणूक झाली आहे.
सर्वप्रथम आढळराव यांच्या उमेदवारीला विरोध करणारे भाजपचे काही पदाधिकारी हे जाहीरपणे आढळराव यांच्याबाबत नकारात्मक बोलत होते. प्रत्येक घरात जाऊन भाजपचा प्रचार-प्रसार या मतदार संघात आढळरावांसाठी कुठेही दिसला नाही. याचा फटकाही आढळरावांना बसला आहे.

प्रचार भलताच...!
पुणे-नगर महामार्गावरील वाहतूक कोंडी, घोडगंगा साखर कारखान्याची दुरवस्था, चासकमानच्या पाण्याची अनियमितता असे काही प्रश्न या निवडणुकीत उपस्थित होऊन प्रचारात यावरच घमासान होईल अशी अपेक्षा होती. मात्र प्रत्यक्षात शिवसेना- राष्ट्रवादीची पक्ष फूट, आढळराव यांनी म्हणायचे गायब खासदार आणि कोल्हेंनी म्हणायचे आढळराव यांनी कसे पक्ष बदलले यावरच संपूर्ण निवडणूक चर्चेत राहिली. अर्थात ही निवडणूक थेट मोदींच्या नेतृत्वापर्यंत घेवून जाण्याचा प्रयत्न झाला. पण येथील उमेदवार आढळराव हे राष्ट्रवादीचे राहिल्याने निवडणूक पक्ष फुटीबरोबरच शरद पवार यांच्या सहानुभूतीमध्येच अडकली.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com