वाबळेवाडीत शालेय समितीची निवड चुकीची

वाबळेवाडीत शालेय समितीची निवड चुकीची

Published on

शिक्रापूर, ता. १८ : येथील वाबळेवाडी जिल्हा परिषद शाळेतील शालेय व्यवस्थापन समितीची निवड चुकीची झाल्याने शाळेवर तत्काळ प्रशासक नेमावा, अशी मागणी येथील ग्रामपंचायत सदस्य तथा शालेय समिती सदस्य प्रकाश वाबळे, शालेय समितीचे माजी अध्यक्ष संदीप वाबळे, अतुल वाबळे यांनी केली.
याबाबतचे पत्र तक्रारदारांनी थेट पुणे जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी गजानन पाटील, शिरूरचे गटविकास अधिकारी, गटशिक्षणाधिकारी बाळकृष्ण कळमकर, मुख्याध्यापक विजय गोडसे यांच्याकडे केले आहे. या तक्रारीनुसार, शाळेचा संपूर्ण कारभार व्यवस्थित सुरु असताना शाळेत शालेय व्यवस्थापन समितीची निवड प्रक्रिया नुकतीच पार पडली. यात मुख्याध्यापक विजय गोडसे यांनी ग्रामस्थांना तथा पालकांना विश्वासात न घेता काही गुंड प्रवृत्तीच्या लोकांचा हस्तक्षेप करवून घेऊन बंद दाराआड निवड प्रक्रिया राबवून शालेय समितीची निवड केली. याबाबत फेरनिवड प्रक्रीया राबविण्याची मागणीही त्यांनी फेटाळली. शिक्षण समिती निवडताना दिव्यांग व इतर मागासवर्गीय जातीच्या पदासाठी पालक उपलब्ध असताना त्यांनी त्यांना घेतले नाही. निवडप्रक्रिया संपली जाहीर करून सभा प्रोसिडिंग कोऱ्या कागदावर करून ५ दिवसांनी ते ठराव रजिस्टरमध्ये नोंदविले. या सर्वांचे सीसीटिव्हीही आपल्याकडे उपलब्ध आहेत. पर्यायाने आत्तापर्यंत नावलौकिक मिळविलेल्या शाळेच्या एकूणच कारभाराबद्दल गंभीर स्थिती निर्माण झाल्याने त्याचा परिणाम अध्यापनावर व शाळेच्या प्रतिमेवर होवू नये म्हणून शाळेवर तत्काळ प्रशासक नेमावा.

आमच्या वाबळेवाडी जिल्हा परिषद शाळेच्या शालेय व्यवस्थापन समितीची निवड प्रक्रिया ही सर्व ग्रामस्थांच्या संमतीने बिनविरोध होऊन अध्यक्ष निवड बहुमताने झालेली आहे. निवड करणे १३ सभासदांनाच संधी होती. त्यांनीच केलेली आहे. १३ पालक सभेत एकमताने आलेत.
- विजय गोडसे, मुख्याध्यापक, वाबळेवाडी शाळा

वाबळेवाडी शाळाप्रकरणी तक्रार प्राप्त झाली असून, आम्ही या प्रकरणाची चौकशी करून कार्यवाही करण्यासाठी एक स्वतंत्र चौकशी अधिकारी म्हणून एका विस्तार अधिकाऱ्याची नेमणूक केलेली आहे. चौकशी अहवाल प्राप्त होताच योग्य ती कार्यवाही करू.
- बाळकृष्ण कळमकर, गटशिक्षणाधिकारी, शिरूर

Marathi News Esakal
www.esakal.com