शिरूरची दुष्काळी गावेही पाण्याखाली

शिरूरची दुष्काळी गावेही पाण्याखाली

Published on

शिक्रापूर, ता. २३ ः शिरूरच्या ज्या गावांना पाण्याचे नेहमी अप्रूप असते, त्याच शिरूरच्या पश्चिम पट्ट्यातील गावांमध्ये सरासरीपेक्षा तब्बल दुप्पट पाऊस झाल्याने सुमारे ८० टक्के शेती पाण्यात गेली आहे.
मे महिन्यापासून सुरू झालेला पाऊस या भागात थांबलेलाच नसल्याने खरिपाची तर पूर्ण वाट लागली असून, रब्बीसाठी कांदा-बटाटे लागवडीवरही पावसाचे सावट आहे. या सर्व स्थितीत शेतकरीवर्ग चिंतेत असून, तत्काळ पंचनामे करावेत, ओला दुष्काळ जाहीर करावा आणि या भागातील शेतकऱ्यांना जगण्याचा तिमाही भत्ता द्यावा, अशा अनेक मागण्या नागरिकांकडून होत आहेत.
शिरूरचा पश्चिम पट्टा म्हणजे कायमच दुष्काळी समजला जातो. हा भाग उंचवट्यावर असल्याने या भागाला ना चासकमानचा लाभ, ना डिंभ्याचे पाणी. पर्यायाने या भागातील १२ गावे कायमच दुष्काळी आहेत. अशातच या गावांनी पाणीदार प्रकल्प सुरू केले आहेत. त्यातल्या त्यात केंदूरने त्यात भरीव काम करून गावचा जलस्तर चांगलाच वाढविला असला, तरी यावर्षीचा जलस्तर हा जमिनीच्याही वर आल्याने पाणीदार गाव नव्हे, तर पाण्याखालील गाव असा प्रकार झाला आहे. या भागात मे पासून पाऊस सुरू झाला असून, उगाच काही आठ- दहा दिवसांची विश्रांती सोडली तर या भागात गेले साडेतीन महिने दररोजच्या पावसाने पाणीच पाणी चोहीकडे झाले आहे. शेतातील बाजरी, मूग, सोयाबिन, तरकारी अक्षरश: पाण्यात गेलेली आहेत. पर्यायाने या १२ गावांचे अर्थकारणच पाण्यात गेले आहे.
याच पार्श्वभूमीवर या गावांमधून संपूर्ण गावात तत्काळ पंचनामे करावेत, ओला दुष्काळ जाहीर करावा आणि शेतकऱ्यांसाठी जगण्याचा तिमाही भत्ता द्यावा, अशी मागणी सूर्यकांत थिटे, सचिन वाबळे, संपत कापरे, अतुल धुमाळ यांनी एका निवेदनाद्वारे केली आहे. या बाबतीत या सर्व पदाधिकाऱ्यांनी हे निवेदन माजी सहकार मंत्री दिलीप वळसे पाटील, माजी खासदार शिवाजीराव आढळराव पाटील, आमदार माउली कटके व खासदार डॉ. अमोल कोल्हे यांच्याकडे पाठविले आहे. या बाबतीत तातडीने कार्यवाही न झाल्यास या सर्व १२ गावांमध्ये तातडीच्या ग्रामसभा घेऊन वरील मागण्यांचे ठराव घेणार असल्याचेही सांगितले.
याबाबत तहसीलदार बाळासाहेब म्हस्के यांच्याशी संपर्क केला असता त्यांनी सांगितले की, ‘‘या बाबतीतच सध्या आमच्या स्तरावर बैठका सुरू असून, शासन निर्देशानुसार पुढील कार्यवाही आम्ही करू.’’

दुपटीहून जास्त पाऊस
पाबळ, केंदूर, धामारी, हिवरे, खैरेनगर, मिडगुलवाडी परिसर म्हणजे कायम ओसाड. या गावांचे सरासरी पर्जन्यमान २२५ ते ३०० असे आहे. मात्र, आतापर्यंत या गावांमध्ये तब्बल ६५० मिलिमीटर म्हणजे दुपटीहून जास्त पाऊस झाला आहे.

04978

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com