जातेगाव खुर्दमधील युवकांच्या शेती कंपनीची भरारी
शिक्रापूर, ता. २२ ः जातेगाव खुर्द (ता. शिरूर) गावातील ७३४ शेतकरी युवकांनी वर्ष २०१९मध्ये सामुहिक शेतीचा प्रयोग तर यशस्वी करून दाखविला आहे. तसेच, ते महिनाभरात दीड हजार टनाचे कोल्ड स्टोअरेज आणि भाजी- फळे डिहायड्रेशन प्रकल्प सुरू करीत आहेत. अर्थात ते एवढ्यावरच थांबलेले नाहीत, तर त्यांनी तब्बल १३ ट्रॅक्टर आणि ४ हार्वेस्टरची खरेदी करून एका मोठ्या व्यावसायिक टप्प्यावर पाऊल टाकले आहे.
जातेगाव खुर्द हे जेमतेम अडीच ते तीन हजार लोकसंख्येचे गाव. चासकमानच्या पाण्यामुळे काहीशी सुबत्ता आली तरी येथील युवकांनी लाव ऊस आणि सोड पाणी, अशा पारंपरिक आणि आळशी शेतीला पर्याय म्हणून थेट शेतीपूरक उद्योग उभे करण्याचा निर्णय घेतला व लगेच त्यांनी अॅग्रोनिर्मिती शेतकरी फार्मा प्रोड्युसर कंपनी सुरू करण्याचा निर्णय घेतला. शासनाच्या विविध योजना, कृषी खात्याचे उत्तम सहकार्य आणि महाराष्ट्र, युनियन आणि स्टेट बॅंकेने दिलेल्या साथीने त्यांनी या कंपनीच्या माध्यमातून सव्वा एकरात ३६ हजार स्क्वेअर फुटाचा सुमारे ९ कोटींचा प्रकल्प उभा केला. तसेच, त्या शेजारी त्यांनी लगेच ५ कोटींचा फळे- भाजी डिहायड्रेशन प्रकल्पही उभा केला. दोन्ही प्रकल्पांना केंद्र-राज्य सरकारची सुमारे ३५ ते ५० टक्के इतके अनुदान असल्याने कामाला बळ मिळाले. याच काळात या युवकांनी दीड मेट्रिक टनाचे कांदा स्टोअरेजही सुरू करून थेट शासनाचा कांदा खरेदीही इथे सुरू केला. एकाच वेळी अनेक बाजूंनी उत्पन्नाच्या बाजू मजबूत करीत स्वत:ला सिद्ध करणाऱ्या या युवकांनी त्यांनी ठरविलेल्या शेतकऱ्याची नवी व्याख्या बनविण्यात ते यशस्वी झाल्याची प्रतिक्रिया प्रगतिशील शेतकरी व युवा माजी सरपंच समाधान डोके यांनी दिली.
पुढील महिनाभरात हे दोन्ही प्रकल्प सुरू होत असून, यालाच सहाय्यभूत होतील आणि परिसरातील ऊस कारखान्यांकडून व्यवसायही मिळेल या उद्देशाने या सर्वांनी नुकतेच एका टप्प्यात १३ ट्रॅक्टर आणि ५ हार्वेस्टर (ऊस तोडणी यंत्र) खरेदी करण्याचा निर्णय घेत ही सर्व वाहने एकाच दिवशी गावात पुजायला आणली. ही सर्व खरेदी सुमारे तीन कोटींची झाली असून, औद्योगिक क्षेत्रातील कुठल्याही बड्या उद्योगपतींना लाजवेल. अशीच ही या सर्वांची किमया म्हणता येईल.
आम्ही सर्व ७३४ शेतकरी व्यावसायिक म्हणून यशस्वी झालोय. गावगाडा, राजकारण, गावकी- भावकी असले विषय चर्चेत न ठेवता पूर्ण दिवस कामात घालविण्याचे आमच्यातील महेंद्र खंडाळे, राहुल काटे, मंगेश खंडाळे, योगेश काशीद, अशोक खंडाळे, मच्छिंद्र मासळकर, शरद मासळकर, जयसिंग मासळकर, सतीश मासळकर आणि सर्वांचेच संस्कार आम्हा संपूर्ण कंपनीला कामाला येत आहेत. शासनाच्या योजना आहेत, सुधारून घ्या. सर्व शेतकरी बांधवांनी एवढेच या निमित्ताने सांगतो.
- अभिजित मासळकर, संचालक
05083
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

