दिवसाऐवजी रात्रीच भारनियमन करा

दिवसाऐवजी रात्रीच भारनियमन करा

Published on

शिक्रापूर, ता. ३ : केंदूर (ता.शिरूर) शिवारात तब्बल सहा बिबट्यांचा वावर आहे. रात्री शेतात पाण्यासाठी जाणेच शक्य नाही. अशा स्थितीत महावितरणने दिवसाचे भारनियमन पूर्ण बंद करून ते केवळ रात्री करण्याची मागणी ग्रामस्थांनी ग्रामसभा घेऊन केली. ही मागणी तत्काळ मंजूर न केल्यास केंदूरसह पाबळ, धामारी, खैरेनगर, कान्हूर आदी ग्रामस्थांसह तीव्र आंदोलन करण्याचा इशारा केंदूर ग्रामस्थांनी दिला.
केंदूर हे शिरूर तालुक्याच्या पश्‍चिम भागातील पूर्ण शेतीवर आधारित प्रमुख गाव आहे. एकूण १९ हजार लोकसंख्येपैकी ९० टक्के ग्रामस्थ शेतीवर अवलंबित आहेत. पर्यायाने सध्या सुरू असलेल्या रब्बी हंगामातील कांदा लागवडीसाठीचा पाणीपुरवठा वेळेत करणे गरजेचा असल्याने गाव विजेच्या भरवशावरच शेती करीत आहे. अशा स्थितीत गेल्या काही महिन्यांपासून गावातील पाचवड, थिटेवाडी, जांभळा, ठाकरवाडी, सुक्रेवाडी, पऱ्हाडमळा आदी भागात बिबट्यांचा वावर मोठा आहे. उपलब्ध माहितीनुसार गावात सहा बिबटे असून रात्री-अपरात्री शेतात जाणे अत्यंत जीवघेणे आहे. पर्यायाने महावितरणे या गावासाठी स्वतंत्र वीजपुरवठ्याचे नियोजन करून जे काही भारनियमन करायचे आहे ते रात्रीचे करून दिवसा पूर्ण दाबाने वीजपुरवठा करावा. असे न केल्यास गावचे वतीने आंदोलन करण्याचा ग्रामसभा ठराव सरपंच मंगल साकोरे, उपसरपंच कल्पना थिटे, माजी सरपंच सूर्यकांत थिटे यांनी केले आहे. त्याबाबतचे निवेदन महावितरणकडेही तत्काळ पाठविलेले आहे. दरम्यान, या भागाचे नेते तथा ज्येष्ठ आमदार, माजी गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनीही यापूर्वीच केंदूरसाठी दिवसभर वीजपुरवठ्याबाबतच्या सूचना दिलेल्या असताना महावितरणकडून त्याची अंमलबजावणी होत नसल्याने तसे पत्र वळसे पाटील यांनाही ग्रामस्थांकडून दिले जाणार असल्याचे सांगण्यात आले.

इतर गावांचाही पाठिंबा
केंदूर सारखीच स्थिती पाबळ, धामारी, खैरेनगर, कान्हूर मेसाई आदी गावांमध्येही आहे. पर्यायाने केंदूरकरांची मागणी मान्य करून ती वरील गावांमध्येही कार्यान्वित करणे गरजेचे असून तसे न केल्यास वरील गावेही केंदूरकरांच्या आंदोलनात सहभागी होणार असल्याची माहिती थिटे यांनी दिली.

केंदूर ग्रामस्थांच्या मागणीनुसार आम्ही कार्यवाही केलेली आहे. पूर्णतः दिवसा वीजपुरवठा होईल असे नियोजन केलेले आहे. याबाबत ग्रामस्थ, ग्रामपंचायत, सरपंच-उपसरपंच तथा प्रमुख पदाधिकारी यांच्याशीही चर्चा केलेली आहे. बिबट्यामुळे आम्हीही गंभीर आहोत; मात्र भारनियमनाचे नियोजन करणे ही तांत्रिक आणि प्रशासकीय प्रक्रिया असल्याने निर्णय पुढील आठवड्यापासून कार्यान्वित होईल एवढेच.
- ए. डी. जावळे, शाखा अभियंता, महावितरण, पाबळ

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com