जिल्हा बॅंकेमुळे रखडला करभरणा

जिल्हा बॅंकेमुळे रखडला करभरणा

रविकिरण सासवडे : सकाळ वृत्तसेवा
काटेवाडी, ता. १३ : राज्याच्या ग्रामविकास विभागाने ग्रामपंचायतींना क्यूआर कोड प्रणालीद्वारे कर भरणा करणे १५ ऑगस्टपासून सक्तीचे केले होते. मात्र, क्यूआर कोड साथीचे पुणे जिल्ह्यातील तब्बल ९३५ ग्रामपंचायतींनी प्रस्ताव पुणे जिल्हा मध्यवर्ती बँकेकडे पडून आहेत. त्यामुळे या ग्रामपंचायतींना क्यूआर कोडद्वारे कर भरणा सुरू करता आला नाही. जिल्ह्यातील केवळ ४५० ग्रामपंचायतींनी क्यूआर कोडद्वारे कर भरणा सुरू केला आहे.

पुणे जिल्ह्यामध्ये एकूण १ हजार ३८५ ग्रामपंचायती आहेत. केंद्र सरकारच्या पंचायतराज मंत्रालयाच्या वतीने जुलै महिन्यात देशातील सर्व ग्रामपंचायतींमध्ये क्यूआर कोडद्वारे कर भरणा करणे बंधनकारक केले होते. यासंदर्भात पंचायतराज मंत्रालयाच्या वतीने सर्व ग्रामपंचायतींना माहिती देण्याच्या सूचना राज्यांना दिल्या होत्या. त्यानुसार ग्रामविकास विभागाच्या वतीने सर्व जिल्हा परिषदांना त्याची अंमलबजावणी करण्याबाबत पत्र पाठविले होते. महानगरपालिका, नगरपालिकांप्रमाणे ग्रामीण भागातील नागरिकांनाही घरबसल्या कर भरता यावेत, यासाठी ग्रामपंचायतींना क्यूआर कोड वापरण्याच्या सूचना दिल्या होत्या. राज्य सरकारने सुरवातीला रत्नागिरी जिल्हा परिषदेला प्रायोगिक तत्त्वावर क्यूआर कोडचा पर्याय उपलब्ध करून दिला होता. तो यशस्वी झाल्यानंतर ऑगस्ट महिन्यात सर्व ग्रामपंचायतींना तो बंधनकारक करण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला होता.
केंद्र सरकारने दिलेल्या निर्देशाप्रमाणे ग्रामपंचायतींचे कामकाज आधुनिक बनविण्याबाबत संबंधित अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना जिल्हा परिषदेकडून सूचना दिल्या होत्या. ग्रामपंचायतींनी त्यांच्या स्वनिधीचे खाते असलेल्या बँकेकडे क्यूआर कोडची मागणी करण्याच्या सूचना द्याव्यात, अशा सूचना सर्व ग्रामपंचायतींना केल्या होत्या. पुणे जिल्ह्यातील सर्वच ग्रामपंचायतींचे स्वनिधी खाते हे पुणे जिल्हा मध्यवर्ती बँकेमध्ये आहे. ग्रामपंचायतींच्या वतीने क्यूआर कोडसाठी पुणे जिल्हा मध्यवर्ती बँकेकडे प्रस्ताव पाठवण्यात आले आहेत. मात्र, या प्रस्तावांना अद्याप प्रतिसाद मिळालेला नाही.

पुणे जिल्हा मध्यवर्ती बँकेकडे आमचा पाठपुरावा सुरू आहे. पुढील आठ ते पंधरा दिवसांमध्ये ग्रामपंचायतींच्या प्रस्तावावर कार्यवाही करण्यात येईल. त्यामुळे सर्वच ग्रामपंचायतीमध्ये क्यूआर कोडद्वारे कर भरणा सुरू होईल.
- विजयसिंह नलावडे,
उपमुख्य कार्यकारी अधिकारी, ग्रामपंचायत प्रशासन, जिल्हा परिषद

क्यू आर कोड प्रणालीद्वारे कर भरणा आढावा
तालुका----------ग्रामपंचायतींची संख्या---------क्यू आर कोड वापरणाऱ्या ग्रामपंचायती
आंबेगाव ----------१३५-------------------२९
बारामती ----------९८--------------------५०
भोर ---------------१५६-----------------५८
दौंड ----------------८०-----------------१४
हवेली ----------------७१----------------३०
इंदापूर ----------------११६---------------११
जुन्नर --------------१४४-----------------२५
खेड --------------१६२------------------८२
मावळ ---------------१०३----------------१३
मुळशी ------------- ९२ ---------------- १८
पुरंदर -------------- ९३ -----------------४७
शिरूर ---------------९६------------------६५
वेल्हे --------------- ७१ ---------------- ०८
एकूण ----------- १,३८५----------------- ४५०

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com