तणनाशकांकडून रानभाज्यांची हिरवळ गिळंकृत

तणनाशकांकडून रानभाज्यांची हिरवळ गिळंकृत

Published on

काटेवाडी, ता. २८ : जिल्ह्यातील इंदापूर, बारामती, दौंड आणि पुरंदर या तालुक्यांतील शेतांमध्ये चिगळ, घोळ, चुका, पातर, माठ, राजगिरा, तांदूळसा, आघाडा आणि कडवंची अशा रानभाज्यांचा सुकाळ पाहायला मिळायचा. त्या केवळ पोटाची खळगी भरण्याचे साधन नव्हत्या तर ग्रामीण आहार संस्कृतीचा अविभाज्य भाग होत्या. पण, आधुनिक शेतीच्या बदलत्या पद्धती आणि तणनाशकांच्या वाढत्या वापराने या रानभाज्यांचा वारसा हळूहळू लुप्त होत आहे.


पावसाळ्यात शेतात खुरपणीला जाणाऱ्या ग्रामीण महिला या रानभाज्या काळजीपूर्वक गोळा करायच्या. या भाज्या त्यांच्या कुटुंबाच्या आहाराचा भाग तर होत्याच, पण आठवडी बाजारात विक्रीसाठीही आणल्या जायच्या. यामुळे महिलांना चार पैसे मिळायचे आणि स्थानिकांना पौष्टिक आहाराचा पर्याय उपलब्ध व्हायचा. आता या बाजारांमध्ये रानभाज्या दुर्मीळ झाल्या आहेत. जुन्या पिढीतील महिला अजूनही या भाज्यांची नावे आवर्जून सांगतात, पण नवीन पिढीला याबद्दल फार कमी माहिती आहे.


तणनाशक रानभाज्यांचा शत्रू...
आधुनिक शेतीत तणनाशकांचा वाढता वापर हा रानभाज्यांच्या अस्तित्वाला मोठा धोका ठरला आहे. पूर्वी खुरपणीच्या पारंपरिक पद्धतीमुळे रानभाज्या शेतात मुबलक उगवायच्या. पण, तणनाशकांच्या वापराने या भाज्यांचे नैसर्गिक अधिवास नष्ट होत आहेत. तणनाशके तणांसह या पौष्टिक रानभाज्यांनाही नष्ट करतात, ज्यामुळे शेतातून या भाज्या हद्दपार होत आहेत. याचा परिणाम केवळ आहारावरच नाही, तर ग्रामीण अर्थव्यवस्थेवरही झाला आहे. रानभाज्यांची विक्री हा महिलांसाठी उत्पन्नाचा एक छोटा पण महत्त्वाचा स्रोत होता, तोआता लुप्त होत आहे.

सांस्कृतिक वारशाचा ऱ्हास
रानभाज्या केवळ अन्नपुरवठा नव्हत्या, तर त्या ग्रामीण संस्कृती आणि परंपरांचे प्रतिक होत्या. जुन्या पिढीतील महिला या भाज्यांच्या पाककृती, त्यांचे औषधी उपयोग आणि त्यांच्याशी जोडलेल्या कथा सांगतात. आपल्या रानात उगवलेली एखादी रानभाजी वानवळा म्हणून देण्याची पद्धत देखील अस्तित्वात होती. पण, नवीन पिढी या वारशापासून वंचित राहत आहे. शहरीकरण, बदलत्या जीवनशैली आणि बाजारपेठेतून मिळणाऱ्या प्रक्रिया केलेल्या खाद्यपदार्थांमुळे रानभाज्यांचे महत्त्व कमी होत आहे.


रान भाज्यांमध्ये विटामिन ए विटामिन के आणि कॅल्शियम या भाज्यांमध्ये असल्यामुळे त्या डोळ्यांसाठी, शारीरिक प्रतिकारशक्तीसाठी, हाडांसाठी उपयुक्त आहेत. या बाजारमध्ये मोठ्या प्रमाणात लोह असते जवळजवळ एका वाटीमध्ये तीन ग्रॅम इतके लोह यातून आपल्या शरीराला मिळते. लोहाच्या कमतरतेमुळे होणारा ॲनिमिया यामध्ये या भाज्या फायदेशीर ठरतात. या भाज्या औषधी मूल्यांनी सुद्धा युक्त अशा आहेत.
- डॉ. स्वाती खारतोडे, संशोधक व आहारतज्ञ पुणे

प्रमुख रानभाज्या आणि त्यांचे महत्त्व..
चिगळ: जीवनसत्त्व ‘अ’ आणि ‘क’ ने समृद्ध, डोळ्यांच्या आरोग्यासाठी आणि रोगप्रतिकारक शक्तीसाठी उपयुक्त.
घोळ: प्रथिनेयुक्त, पचनसंस्थेला सौम्य आणि पावसाळ्यातील सर्दीवर गुणकारी.
चुका: लोह आणि फायबरने परिपूर्ण, रक्तवाढीसाठी आणि बद्धकोष्ठतेवर प्रभावी.
पातर: अँटिऑक्सिडंट्सने युक्त, त्वचेच्या आरोग्यासाठी आणि जळजळ कमी करण्यास उपयुक्त.
माठ: कॅल्शियम आणि लोह यांचा चांगला स्रोत, हाडांच्या मजबुतीसाठी फायदेशीर.
राजगिरा: प्रथिने आणि खनिजांचा खजिना, शक्ती आणि सहनशक्ती
वाढवण्यास मदत.
तांदूळसा: जीवनसत्त्व ‘ब’ कॉम्प्लेक्सने समृद्ध, मज्जासंस्थेच्या आरोग्यासाठी उपयुक्त.

27017

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com