जवळेश्वर मंदिरामुळे मिळते सकारात्मक ऊर्जा
रविकिरण सासवडे : सकाळ वृत्तसेवा
काटेवाडी, ता. २७ : जळगाव सुपे (ता. बारामती) येथे शेकडो भाविकांनी कऱ्हा नदीच्या काठावर वसलेल्या जवळेश्वर महादेव मंदिरात श्रावण महिन्याच्या पहिल्या दिवशी दर्शनाचा लाभ घेतला. मंदिर परिसरातील शांत वातावरण, ऐतिहासिक ठेवा आणि प्राचीन स्थापत्यकला यामुळे हे ठिकाण प्रत्येक भक्ताला आणि पर्यटकाला आकर्षित करते. निसर्ग सौंदर्याने नटलेल्या मंदिरामुळे भाविकांना सकारात्मक ऊर्जा मिळते.
इतिहास अभ्यासक रणजित ताम्हाणे या मंदिराबाबत माहिती देताना सांगतात, जवळेश्वर महादेव मंदिर हे कऱ्हा नदीकाठी, जळगाव कडेपठारवरून जळगाव सुपे गावात जाणाऱ्या रस्त्याच्या कडेला आहे. हे अतिप्राचीन मंदिर इतिहास आणि अध्यात्माचा एक अद्भूत संगम आहे. हे मंदिर केवळ धार्मिक स्थळ नसून, एक उत्तम स्थापत्य नमुना आणि ऊर्जास्थान आहे. येथील शेजारी असलेले कालहस्तेश्वर मंदिर देखील विशेष आहे. पंचमहाभूतांपैकी वायूतत्वाचे प्रतीक असलेले कालहस्तेश्वर मंदिर तिरुपती येथे प्रसिद्ध आहे, आणि तिरुपतीनंतर जळगाव सुपे येथील हे मंदिर कदाचित महाराष्ट्रातील एकमेव कालहस्तेश्वर मंदिर असावे, असे ताम्हाणे सांगतात.
मंदिर परिसरात वैशिष्ट्यपूर्ण विरगळ
जवळेश्वर मंदिर परिसरात भव्य आणि अप्रतिम कोरीव काम असलेल्या ऐतिहासिक वीरगळ मोठ्या संख्येने आहेत. सातारा जिल्ह्यातील किकली गाव वीरगळींचे गाव म्हणून ओळखले जाते, तितक्याच भव्य आणि वैशिष्ट्यपूर्ण वीरगळ या मंदिर परिसरात आहेत. यामुळे इतिहास अभ्यासकांचेही या ठिकाणाकडे विशेष लक्ष आहे.
ग्रामस्थांच्या सहकार्याने जीर्णोद्धार.....
काही वर्षांपूर्वी हे मंदिर जीर्ण अवस्थेत होते. परंतु, गावातील संजय भगवान थोरात आणि अप्पासाहेब खोमणे यांनी दीड वर्षांपूर्वी या मंदिराचा कायापालट करण्याचे स्वप्न पाहिले. गावकऱ्यांच्या आणि इतर भक्तांच्या सहयोगाने त्यांनी मंदिराच्या मूळ रचनेला कोणताही धक्का न लावता अतिशय सुंदर पद्धतीने सुशोभीकरण केले. आज हे मंदिर पूर्णत्वाकडे जात आहे.
01157