क्षयरोगाविरुद्धच्या लढाईत बारामती तालुका अग्रेसर
काटेवाडी, ता. २ : बारामती तालुक्यात क्षयरोगाविरुद्धची लढाई यशस्वीपणे पुढे सरकत आहे. मागील वर्षी ५१९ क्षयरोगींपैकी ५०७ रुग्ण औषधोपचारानंतर पूर्ण बरे झाले. सध्या २४७ रुग्णांवर उपचार सुरू असून, ‘टीबी मुक्त भारत अभियाना’च्या माध्यमातून हा आजार पूर्णपणे नष्ट करण्यासाठी तालुका आरोग्य विभाग प्रयत्नशील आहे, अशी माहिती तालुका आरोग्य अधिकारी डॉ. मनोज खोमणे यांनी दिली.
‘क्षयरोग’ हा मायक्रोबॅक्टेरियम ट्युबरक्युलोसिस या जिवाणूंमुळे होणारा संसर्गजन्य आजार आहे. हा प्रामुख्याने फुप्फुसांना बाधित करतो आणि खोकला किंवा शिंकण्याद्वारे हवेतून पसरतो. जगातील एकूण क्षयरोगी रुग्णांपैकी २७ टक्के रुग्ण भारतात आहेत. ही चिंताजनक बाब आहे. याच पार्श्वभूमीवर केंद्र सरकारने २०२५ पर्यंत भारताला टीबीमुक्त करण्याचे उद्दिष्ट ठेवले आहे. या अभियानांतर्गत तत्काळ निदान, त्वरित औषधोपचार आणि रुग्णांना पोषण भत्ता देण्याच्या योजना राबवल्या जात आहेत. एनएएटी (न्यूक्लिक अॅसिड अॅम्प्लिफिकेशन टेस्ट) आणि क्ष-किरण तपासणीच्या आधारे रुग्णांचे निदान केले जाते. यासाठी दोन थुंकी नमुने आवश्यक असतात.
लक्षणे आणि जोखीम
क्षयरोगाची प्रमुख लक्षणे म्हणजे दोन आठवड्यांपेक्षा जास्त काळ खोकला, वजन कमी होणे, भूक न लागणे, संध्याकाळी ताप येणे आणि थुंकीतून रक्त पडणे. अति जोखीम गटातील व्यक्तींमध्ये (उदा. मधुमेह बाधित, धूम्रपान करणारे, कमी वजन असलेले) एका दिवसाची लक्षणेही गंभीर मानली जातात आणि त्वरित तपासणी आवश्यक आहे. या अभियानात अति जोखीम गटातील व्यक्ती, कंपनी कामगार, अनाथाश्रमातील मुले, वृद्धाश्रमातील व्यक्ती, टीबी रुग्णाच्या संपर्कातील व्यक्ती यांच्यावर विशेष लक्ष दिले जात आहे.
शासकीय योजना आणि प्रोत्साहन
भारत सरकारच्या राष्ट्रीय क्षयरोग दूरीकरण कार्यक्रमांतर्गत सर्व रुग्णांना सहा महिन्यांसाठी दरमहा १ हजार रुपये, म्हणजेच एकूण ६ हजार रुपये पोषण भत्ता दिला जातो. खासगी डॉक्टरांनी क्षयरोगी रुग्णाची माहिती शासकीय रुग्णालयात नोंदवल्यास त्यांना ५०० रुपये प्रोत्साहन मिळते. तसेच, रुग्णांना औषधोपचार देणाऱ्या आशा स्वयंसेविकांना १ हजार रुपये मानधन दिले जाते.
बारामतीतील यशस्वी प्रयत्न
बारामती तालुक्यात राष्ट्रीय क्षयरोग दूरीकरण कार्यक्रम यशस्वीपणे राबवला जात आहे. प्राथमिक आरोग्य केंद्रे आणि ग्रामीण रुग्णालयांमार्फत तालुका आरोग्य विभाग, जिल्हा क्षयरोग अधिकारी आणि राज्य क्षयरोग नियंत्रण अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली ही मोहीम राबवली जाते, असे डॉ. खोमणे यांनी सांगितले. क्षयरोग पूर्णपणे बरा होऊ शकतो, पण त्यासाठी वेळीच निदान आणि नियमित औषधोपचार आवश्यक आहे. नागरिकांनी लक्षणे आढळल्यास त्वरित जवळच्या आरोग्य केंद्रात संपर्क साधावा, असे आवाहन तालुका आरोग्य विभागाने केले आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.