प्रधानमंत्री पीक विमा योजनेकडे शेतकऱ्यांची पाठ

प्रधानमंत्री पीक विमा योजनेकडे शेतकऱ्यांची पाठ

Published on

काटेवाडी, ता. २ : जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी प्रधानमंत्री पीक विमा योजना खरीप २०२५ साठी अपेक्षेपेक्षा कमी नोंदणी केली आहे. जिल्ह्यातील १३ तालुक्यांमधील एकूण १९,५२७ शेतकऱ्यांनी या योजनेत सहभाग घेतला असून, ९,४६९ हेक्टर क्षेत्राचा विमा उतरवला आहे. यामुळे शेतकऱ्यांना नैसर्गिक आपत्ती, कीड किंवा रोगांमुळे होणाऱ्या नुकसानीपासून संरक्षण मिळेल, परंतु योजनेला अपेक्षित प्रतिसाद मिळाला नाही. यामुळे १४ ऑगस्ट पर्यंत मुदत वाढविली आहे.


विम्याची रक्कम ४९ कोटी ५० लाखांवर
जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी खरीप हंगाम २०२५ साठी पीएमएफबीवाय अंतर्गत मर्यादित प्रमाणात नोंदणी केली आहे. यामध्ये ९,७३४ कर्जदार आणि १६,३२० बिगर-कर्जदार शेतकऱ्यांचा समावेश आहे. एकूण १९,५२७ शेतकऱ्यांनी ९,४६९ हेक्टर क्षेत्राचा विमा काढला असून, यासाठी एकूण ४९ कोटी ५० लाख रुपयांचा विमा उतरवण्यात आला आहे. योजनेसाठी नोंदणीची अंतिम मुदत ३१ जुलै २०२५ होती, परंतु आता ती १४ ऑगस्ट २०२५ पर्यंत वाढवण्यात आली आहे. यामुळे अधिक शेतकऱ्यांना सहभागी होण्याची संधी मिळेल.


नोंदणीत शिरूर, पुरंदर आघाडीवर
जिल्ह्यातील शिरूर तालुक्यात सर्वाधिक ३,२५५ शेतकऱ्यांनी नोंदणी केली असून, १,६७५.५३ हेक्टर क्षेत्राचा विमा काढला आहे. याशिवाय, अंबेगाव (२,९१६ शेतकरी), जुन्नर (१,९९६ शेतकरी) आणि पुरंदर (३,१९० शेतकरी) यांनीही नोंदणी केली आहे. मात्र, भोर (१४८ शेतकरी) आणि हवेली (८१ शेतकरी) यांसारख्या तालुक्यांमध्ये सहभाग अत्यंत कमी आहे. वेल्हे तालुक्यात १,०६१ शेतकऱ्यांनी नोंदणी केली आहे. एकूणच, जिल्ह्यात योजनेला अपेक्षित प्रतिसाद मिळाला नाही.

शेतकऱ्यांसाठी आर्थिक संरक्षण......
प्रधानमंत्री फसल बीमा योजना ही केंद्र सरकारची महत्त्वाकांक्षी योजना आहे, जी शेतकऱ्यांना दुष्काळ, पूर, गारपीट, किडींचा प्रादुर्भाव यांसारख्या नैसर्गिक आपत्तींपासून संरक्षण देते. खरीप पिकांसाठी शेतकऱ्यांना केवळ २ टक्के प्रीमीयम भरावा लागतो, तर उर्वरित रक्कम केंद्र आणि राज्य सरकार मिळून भरतात. यामुळे शेतकऱ्यांना कमी खर्चात आर्थिक सुरक्षा मिळते. नुकसान झाल्यास ७२ तासांच्या आत नोंदणी करणे आवश्यक आहे, ज्यामुळे दाव्याची प्रक्रिया जलद पूर्ण होते.


अधिक शेतकऱ्यांनी सहभागी होण्याचे आवाहन
जिल्हा प्रशासनाने शेतकऱ्यांना या योजनेत सहभागी होण्याचे आवाहन केले आहे. “पीएमएफबीवाय ही शेतकऱ्यांसाठी आर्थिक संरक्षणाची ढाल आहे. शेतकऱ्यांनी १४ ऑगस्टपर्यंत नोंदणी करावी,” असे जिल्हा कृषी अधिकारी यांनी सांगितले. डिजिटल तंत्रज्ञानाचा वापर, जसे की ड्रोन, उपग्रह चित्रण आणि स्मार्टफोन अॅप्स, यामुळे नुकसान मूल्यांकन अधिक अचूक आणि जलद झाले आहे. शेतकरी pmfby.gov.in या संकेतस्थळावर ऑनलाइन नोंदणी करू शकतात किंवा जवळच्या बँक, सहकारी संस्था किंवा सामाईक सेवा केंद्रात ऑफलाइन अर्ज करू शकतात.

तालुकानिहाय सहभाग
तालुका नाव......शेतकरी संख्या........विमा क्षेत्र (हेक्टर)
आंबेगाव..........२,९१६..............१,८७९.३९
बारामती..........१,९१०...............८६८.१६
भोर..............१४८................४४.७
दौंड...............३३२...............१७२.२
हवेली..............८१................४०.४१
इंदापूर.............२,३१५..............१,३८६.६०
जुन्नर..............१,९९६...............९८८.७३
खेड..............१,५७६...............६५८.५८
मावळ..............४२०...............१६५.८३
मुळशी.............३२७.................९१.५४
पुरंदर............३,१९०...............१,१९८.५९
शिरूर............३,२५५...............१,६७५.५३
वेल्हे.............१,०६१...............२९९.१२

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com