कमी खर्चात उभारा कांदा, लसूण साठवणूक गृह
काटेवाडी, ता. १३ : शेतकऱ्यांना कांदा आणि लसूण शास्त्रशुद्ध पद्धतीने साठवण्यासाठी एकात्मिक फलोत्पादन विकास अभियान राबविले जात आहे.
कांद्याची गुणवत्ता टिकवून बाजारात पुरवठा साखळी सुधारण्यास मदत होईल. यासाठी कमी खर्चाच्या साठवणूक गृह उभारणीसाठी अनुदान योजनेसाठी अर्ज प्रक्रिया सुरू आहे, अशी माहिती कृषी विभागातर्फे देण्यात आली.
कांदा चाळीअभावी शेतकरी मेहनतीने पिकवलेल्या कांद्याचे मोठ्या प्रमाणात नुकसान सहन करतात. चुकीच्या साठवणुकीमुळे कांदा सडतो, त्याची गुणवत्ता कमी होते आणि बाजारात योग्य भाव मिळत नाही. यामुळे शेतकऱ्यांचे आर्थिक नुकसान तर होतेच, पण त्यांच्या कष्टावर पाणी फिरते. शास्त्रशुद्ध कांदा चाळीमुळे कांदा दीर्घकाळ टिकतो, त्याची गुणवत्ता कायम राहते आणि शेतकऱ्यांना योग्य वेळी बाजारात विक्री करून चांगला नफा मिळवता येतो. या आर्थिक वर्षात ही योजना राबविली जाणार असून, शेतकऱ्यांनी महाडीबीटी पोर्टलवर ‘फलोत्पादन’ घटकाखाली अर्ज करावेत. यामुळे कांद्याचे नुकसान टाळून अधिक नफा मिळवता येईल. शेतकऱ्यांनी या योजनेचा लाभ घेऊन शास्त्रशुद्ध कांदा-लसूण साठवणूक गृह उभारावेत, असे आवाहन कृषी विभागाने केले आहे.
------------------------------
योजनेसाठी अनुदानाची मर्यादा
मर्यादा टनात............ गृहीत खर्च रुपयांत (प्रति टन)............ जास्तीत जास्त खर्च रुपयांत
५ ते २५ टन............१०,०००............५,०००
२५ ते ५००............८,०००............४,०००
५०० ते १,०००............६,०००............३,०००
(प्रकल्प खर्च ३० लाखांपेक्षा जास्त असल्यास बँक कर्ज बंधनकारक)
हे आहेत निकष
१. शेतकऱ्याकडे स्वतःच्या मालकीची जमीन आणि ७/१२ उताऱ्यावर कांदा पिकाची नोंद आवश्यक.
२. वैयक्तिक शेतकरी, शेतकरी गट, स्वयंसहाय्यता गट, महिला गट, उत्पादक संघ, नोंदणीकृत शेती संस्था, सहकारी पणन संघ पात्र.
आवश्यक कागदपत्रे....
* आधार कार्ड, ७/१२
* ८-अ उतारा, हमीपत्र,
* बंधपत्र, अनुसूचित जाती/जमातींसाठी संवर्ग प्रमाणपत्र
तांत्रिक निकष...
* कांदा चाळ जमिनीपासून किमान ६० सेंटिमीटर उंच असावी.
* चाळीची लांबी दक्षिण-उत्तर दिशेला, जास्त पावसाच्या ठिकाणी पूर्व-पश्चिम दिशेला असावी.
-------------------------