रेशीम शेतीस नव्या तंत्रज्ञानाचे बळ
काटेवाडी, ता. १६ : भारतातील रेशीम शेतीला बळकटी देण्यासाठी आणि शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढवण्यासाठी केंद्रीय रेशीम मंडळाने (सीएसबी) ‘माझं रेशीम, माझा अभिमान’ ही महत्वाकांक्षी तंत्रज्ञान हस्तांतरण मोहीम सुरू केली आहे. येत्या सप्टेंबर २०२५ दरम्यान देशभरातील १००-१२० जिल्ह्यांमध्ये राबवली जाणारी ही १०० दिवसांची मोहीम शेतकऱ्यांना आधुनिक तंत्रज्ञान आणि वैज्ञानिक पद्धतींचा अवलंब करण्यास प्रोत्साहन देण्यात येत आहे. यामुळे शाश्वत उत्पन्न मिळून रेशीम शेतीस नवसंजीवनी मिळणार आहे.
प्रत्येक जिल्ह्यासाठी केंद्रीय रेशीम मंडळाचा एक शास्त्रज्ञ रेशीम उत्पादक शेतकऱ्यांना थेट बांधावर जाऊन भेटत आहे. यामध्ये शेतकऱ्यांच्या समस्या, दर्जेदार रेशीम उत्पादन याबाबत चर्चा करत असून शेतकऱ्यांनाही थेट शास्त्रज्ञांकडून मोलाचे मार्गदर्शन मिळत आहे. भारत हा जगातील दुसऱ्या क्रमांकाचा रेशीम उत्पादक देश असून, रेशीम शेती हा ग्रामीण भागातील हजारो कुटुंबांचा आर्थिक आधार आहे. रेशीम उत्पादन आणि उत्पादकता वाढवण्यासाठी केंद्रीय रेशीम मंडळ (सीएसबी) आणि राज्य रेशीम विभाग (डीओएस) यांच्या सहकार्याने नावीन्यपूर्ण मोहीम सुरू करण्यात येत आहे. येत्या २०२५-२६ मध्ये ४६,५०० टन रेशीम उत्पादनाचे राष्ट्रीय उद्दिष्ट गाठण्यासाठी ही मोहीम शेतकऱ्यांना आधुनिक तंत्रज्ञान आणि वैज्ञानिक पद्धतींचा अवलंब करण्यास मदत करेल, अशी माहिती सीएसबीचे शास्त्रज्ञ राठोड यांनी दिली.
योजनेच्या दुसऱ्या टप्प्यात उत्तर आणि वायव्य भारतातील जिल्ह्यांमध्ये विस्तार करून सर्वसमावेशक राष्ट्रीय विस्तार सुनिश्चित केला जाईल. प्रत्येक जिल्ह्यात शास्त्रज्ञ, नोडल अधिकारी आणि सहाय्यक कर्मचाऱ्यांचा समावेश असलेला समर्पित संघ कार्यरत असेल. शेतकऱ्यांना प्रशिक्षण, जागरूकता कार्यक्रम, शेतातील प्रात्यक्षिके आणि सल्लागार सेवा यांचा लाभ मिळेल.
मोहिमेची उद्दिष्टे
१. रेशीम शेतकऱ्यांच्या तांत्रिक क्षमता वाढवणे
२. राज्यस्तरीय विस्तार सेवा बळकट करणे
३. शेतस्तरावरील आव्हानांवर आधारित संशोधन करणे
४. सुधारित किड्यांच्या जाती, वैज्ञानिक संगोपनाची माहिती देणे
५. कीड-रोग व्यवस्थापनातून उत्पन्न वाढविणे
डिजिटल निरीक्षण आणि पारदर्शकता
मोहिमेच्या प्रगतीचे निरीक्षण डिजिटल प्लॅटफॉर्मद्वारे केले जाईल. यामध्ये भू-टॅग केलेली छायाचित्रे, जीआयएस स्थान आणि रिअल-टाइम डेटा अपलोड्स यांचा समावेश असेल. यामुळे पारदर्शकता आणि प्रभावी डेटा-आधारित निर्णयप्रक्रिया शक्य होईल. सर्व उपक्रम एका केंद्रीय डॅशबोर्डद्वारे ट्रॅक केले जातील.
योजनेचा अपेक्षित परिणाम...
शेतकरी आधुनिक तंत्रज्ञान आणि वैज्ञानिक पद्धतींचा अवलंब करतील.
कोकून उत्पादन आणि गुणवत्तेत वाढ होऊन शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढेल.
प्रशिक्षणाद्वारे शेतकरी आणि कर्मचाऱ्यांच्या तांत्रिक क्षमता बळकट होतील.
शेतस्तरावरील माहितीमुळे गरजेनुसार संशोधनाला प्रोत्साहन मिळेल.
ही योजना रेशीम शेती आणि संलग्न क्षेत्रांसाठी दीर्घकालीन मॉडेल बनण्याची क्षमता आहे.
माझं रेशीम, माझा अभिमान मोहीम रेशीम शेतीला शाश्वत आणि नफ्यदायी बनवेल. पारंपरिक आणि गैर-पारंपरिक जिल्ह्यांमध्ये रेशीम शेतीच्या विस्ताराद्वारे ही योजना भारताला जागतिक रेशीम बाजारपेठेत अग्रेसर बनवण्यास मदत करेल. शेतकऱ्यांचे सक्षमीकरण, डिजिटल निरीक्षण आणि वैज्ञानिक सहभाग यामुळे ही मोहीम रेशीम क्षेत्रात आमूलाग्र बदल घडवून आणेल.
- डॉ. सुनील राठोड, शास्त्रज्ञ, केंद्रीय रेशीम मंडळ, संशोधन विस्तार केंद्र, बारामती
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.