इंदापुरात मुबलक, बारामतीत कमी
काटेवाडी, ता. २९ : इंदापूर तालुक्यातील अंथुर्णे आणि सणसर मंडळांनी ऑगस्ट महिन्यात सर्वाधिक पाऊस अनुभवला, तर बारामती तालुक्यातील मंडळांमध्ये तुलनेने कमी पाऊस नोंदवला गेला. या पावसामुळे खरीप हंगामातील जिरायती पिकांना चालना मिळणार असली, तरी फळबागा आणि तरकारी पिकांवर रोगांचा प्रादुर्भाव वाढण्याची शक्यता आहे.
इंदापूर तालुक्यात अंथुर्णे आणि सणसर मंडळामध्ये समाधानकारक पाऊस पडला आहे. इंदापूर मंडळातही चांगला पाऊस झाला. मात्र, लाखेवाडी, काटी आणि बावडा मंडळांत पाऊस अत्यंत कमी राहिला. दुसरीकडे, बारामती तालुक्यात बारामती मंडळाने सर्वाधिक पाऊस पाहिला, तर लोणी भापकर आणि शिर्सुफळ मंडळांतही मध्यम स्वरूपाचा पाऊस पडला. या उलट, मोरगाव, वडगाव निंबाळकर आणि पणदरे मंडळांत पाऊस खूपच कमी राहिला. या पावसामुळे ज्वारी, बाजरी, मका आणि कडधान्यांसारख्या जिरायती पिकांना मोठा फायदा होईल.
इंदापूर तालुक्यात ऑगस्ट महिन्यात एकूण ६०.७ मिलिमिटर पाऊस झाला असून सरासरीच्या ७२ टक्के पाऊस झाला आहे. तर बारामती तालुक्यात एकूण ४४.३ मिलिमिटर पाऊस खाला असून सरासरीच्या ७२.५ टक्के पाऊस झाला आहे.
भारतीय हवामान खात्याच्या अहवालानुसार ऑगस्टमधील पावसाने पश्चिम महाराष्ट्रातील खरीप पिकांना पोषक वातावरण निर्माण केले आहे. विशेषतः कमी पाण्यावर अवलंबून असलेल्या पिकांना याचा फायदा होईल, ज्यामुळे उत्पादनात १५-२० टक्के वाढ अपेक्षित आहे. तथापि, सततच्या ओलाव्यामुळे फळबागांमध्ये (उदा. द्राक्ष, डाळिंब) आणि तरकारी पिकांमध्ये (उदा. टोमॅटो, वांगी) बुरशीजन्य रोग आणि किडींचा प्रादुर्भाव वाढण्याचा धोका आहे. शेतकऱ्यांनी रोगनियंत्रणासाठी योग्य कीटकनाशकांचा वापर आणि पिकांची नियमित तपासणी करावी. या पावसाने शेतकऱ्यांना दिलासा दिला असला, तरी पिकांचे नुकसान टाळण्यासाठी सतर्कता बाळगणे आवश्यक आहे.
पावसाची मंडळनिहाय आकडेवारी (मिलिमीटर)
मंडळ............ एकूण पाऊस............ टक्केवारी
बारामती तालुका
बारामती...........८७.२..................१४२.७
माळेगाव...........४४.८..................७३.३
पणदरे.............३५.९..................५८.८
वडगाव निंबाळकर....३१.५.................५१.६
लोणी भापकर........४७.२.................७७.३
सुपा..............३९.८.................६५.१
मोरगाव..........…..२६.२...........…....४२.९
उंडवडी...........४०.५.................६६.३
शिर्सुफळ..........४६.०..................७५.३
इंदापूर तालुका
भिगवण.........४५.२..................५३.६
इंदापूर..........११२.३.................१३३.२
लोणी देवकर..........३७.९..............४५.०
बावडा.............२३.७.................२८.१
काटी..............२२.४................२६.६
निमगाव केतकी.......४७.३................५६.१
अंथुर्णे.............१५३.८...............१८२.८
सणसर............९०.५.................१०७.४
पळसदेव...........५३.६...................६३.६
लाखेवाडी...........१९.१..................२२.७