रेशीम उद्योगाच्या स्वप्नाला बळ
काटेवाडी, ता. १४ : महाराष्ट्राला हिरवगार आणि समृद्ध करण्याच्या ''हरित महाराष्ट्र, समृद्ध महाराष्ट्र'' अभियानाला गती देण्यासाठी राज्य सरकारने रेशीम उद्योगाला चालना देण्याचा निर्णय घेतला आहे. यासाठी शेतकऱ्यांमध्ये रेशीम उद्योगाबाबत जागरूकता वाढवण्यासाठी आणि तुती लागवडीला प्रोत्साहन देण्यासाठी सरकारने १ कोटी २७ लाख रुपयांच्या निधीला मंजुरी दिली आहे. यामुळे रेशीम उद्योगाच्या स्वप्नाला बळ मिळणार आहे.
यंदा पावसाळ्यात १० कोटी वृक्ष लागवडीच्या व्यापक उद्दिष्टापैकी रेशीम संचालनालयाला ४ कोटी तुती रोपे लावण्याचे लक्ष्य देण्यात आले आहे.
सहकार, पणन आणि वस्त्रोद्योग विभागाने ९ सप्टेंबर रोजी याबाबतचा शासन निर्णय जाहीर केला आहे.
राज्यातील २७ जिल्हा कार्यालयांद्वारे या निधीचे वितरण होणार असून, प्रत्येक जिल्ह्यासाठी अंदाजे ११ लाख रुपये उपलब्ध करून दिले जाणार आहेत. हा निधी वाहन भाड्याने घेऊन प्रचार-प्रसिद्धी मोहीम राबवण्यासाठी वापरला जाईल, ज्यामुळे शेतकऱ्यांना तुती लागवडीसाठी प्रेरित केले जाईल. सध्या ७ हजार ३५८ एकर क्षेत्रावर तुती लागवडीची नोंदणी झाली आहे.
वित्त विभागाच्या २२ ऑगस्ट २०२५ रोजीच्या संमतीनंतर हा निर्णय घेण्यात आला आहे. या निर्णयामुळे तुती लागवड आणि रेशीम उद्योगाला चालना मिळण्याबरोबरच हरित महाराष्ट्राच्या स्वप्नाला बळ मिळणार आहे. शेतकऱ्यांना आर्थिकदृष्ट्या सक्षम करताना पर्यावरण संवर्धनाचे उद्दिष्टही साध्य होईल, असा विश्वास व्यक्त होत आहे.