गुणवत्तेवर मिळणार ग्रामपंचायतींना कोटींचा सन्मान

गुणवत्तेवर मिळणार ग्रामपंचायतींना कोटींचा सन्मान

Published on

काटेवाडी, ता. १२ : मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज अभियानांतर्गत ग्रामपंचायतींना कामाच्या गुणवत्तेनुसार प्रथम, द्वितीय आणि तृतीय क्रमांकासाठी अनुक्रमे पाच कोटी, तीन कोटी आणि दोन कोटी रुपयांची पारितोषिके जिंकण्याची संधी आहे. या अभियानाच्या मार्गदर्शक सूचनांनुसार ग्रामपंचायतींनी एकजुटीने काम करावे, असे आवाहन गटविकास अधिकारी किशोर माने यांनी केले.
लोणी पाटी (ता. बारामती) येथे जिल्हा परिषदेच्या वतीने शुक्रवारी (ता. १२) पंचायत समितीमार्फत आयोजित कार्यशाळेत ते बोलत होते. यावेळी गटविकास अधिकारी किशोर माने यांनी अभियानादरम्यान करावयाच्या कामांची सविस्तर माहिती दिली. यशदाचे प्रशिक्षक जालिंदर काकडे यांनी प्रात्यक्षिकाद्वारे अभियानाची माहिती आणि शासनाच्या गुणांकन तक्त्यानुसार मार्गदर्शन केले. अभियानाच्या यशस्वितेसाठी ग्रामपंचायतींनी एकजुटीने आणि नियोजनबद्ध काम करावे, असे आवाहन यावेळी करण्यात आले. कार्यशाळेत ९९ ग्रामपंचायतींच्या प्रतिनिधींनी उत्साहाने सहभाग घेतला. अभियानाच्या यशासाठी सर्वांनी कटिबद्ध असल्याचे यावेळी दिसून आले. ग्रामपंचायतींनी आधुनिक तंत्रज्ञान आणि लोकसहभागाच्या माध्यमातून गावांचा विकास साधावा, अशी अपेक्षा व्यक्त करण्यात आली. या कार्यशाळेत साहाय्यक गटविकास अधिकारी नंदन जरांडे, परिविक्षाधीन साहाय्यक गटविकास अधिकारी प्रदीप गादेकर, तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ. मनोज खोमणे, गटशिक्षणाधिकारी नीलेश गवळी, पशुधन विकास अधिकारी धनंजय पोळ, सहायक कृषी अधिकारी सुनील गायकवाड, विस्तार अधिकारी सुनील जगताप, यशदाचे प्रशिक्षक जालिंदर काकडे, राजेंद्र चांदगुडे यांच्यासह ९९ ग्रामपंचायतींचे सरपंच, उपसरपंच, सदस्य, ग्रामपंचायत कर्मचारी, ग्राम रोजगार सेवक, संगणक परिचालक आणि आपले सरकार केंद्र चालक उपस्थित होते.

ग्रामपंचायतीसमोर मांडलेले मुद्दे.....
कामकाजाचे निकष : लोकाभिमुख प्रशासन, नागरी सेवा सुविधा केंद्राचा दर्जा, तक्रार निवारण, ग्रामपंचायत संकेतस्थळ, सीसीटीव्ही, लेखापरीक्षण, ग्रामसभा नोंदवही, दप्तर अद्यावतीकरण, आयुष्यमान भारत कार्ड वितरण, दिव्यांग ओळखपत्र, कर आणि पाणीपट्टी वसुली, पाण्याचा ताळेबंद, शुद्ध पिण्याचे पाणी, रेन वॉटर हार्वेस्टिंग, सूक्ष्म सिंचन, सौर ऊर्जा वापर, वृक्ष लागवड, प्लास्टिक बंदी आदी बाबींवर भर.

पुरस्कारांचे स्वरूप: ग्रामपंचायत स्तरावर १,८७८, पंचायत समिती स्तरावर २१ आणि जिल्हा परिषदस्तरावर ३ असे एकूण १,९०२ पुरस्कार देण्यात येणार.

प्रशिक्षण आणि मार्गदर्शन : यशदाचे प्रशिक्षक जालिंदर काकडे यांनी प्रात्यक्षिकाद्वारे अभियानाची माहिती दिली. शासनाच्या गुणांकन आणि मूल्यांकन तक्त्यानुसार मार्गदर्शन केले.

मार्गदर्शक पुस्तिका वितरण : कार्यशाळेत उपस्थित सरपंच, उपसरपंच, ग्रामपंचायत सदस्य, अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना अभियानाची मार्गदर्शक पुस्तिका वाटप करण्यात आली.

Marathi News Esakal
www.esakal.com