अर्धवट गटार वाहिनीमुळे पिकांचे नुकसान
काटेवाडी, ता. १८ ः काटेवाडी (ता. बारामती) हद्दीतील पालखी महामार्गाच्या लिमटेक उड्डाणपुलाशेजारील अर्धवट गटार वाहिनीच्या कामामुळे शेतात पावसाचे पाणी साचत आहे. त्यामुळे शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान होत आहे.
या गटार वाहिनीचे पाणी अनिल सीताराम काटे, अजित रमेश काटे, दत्तात्रेय राजाराम काटे, रामभाऊ काटे, सुनील काटे आदी शेतकऱ्यांच्या पिकांत साचल्याने नुकसान होत आहे. शेतकऱ्यांनी या ठिकाणी उसाच्या लागवडी केल्या आहेत. साचलेल्या पाण्यामुळे उसाची मुळे कुजून पाण्यावर शेवाळ साचत आहे. परिणामी, परिसरात दुर्गंधी पसरली आहे. त्यामुळे शेतकऱ्यांसह आसपासच्या रहिवाशांचेही आरोग्य धोक्यात आले आहे. गेल्या दोन- तीन वर्षांपासून ही समस्या शेतकऱ्यांना भेडसावत आहे.
गटार वाहिनीचे काम पूर्ण करून पाण्याचा योग्य निचरा करण्याची मागणी शेतकरी करीत आहेत. ही समस्या तत्काळ सोडवली नाही, तर यंदाच्या हंगामातही शेतकऱ्यांचे मोठे आर्थिक नुकसान होण्याची भीती आहे. प्रशासनाने याकडे त्वरित लक्ष द्यावे, अशी मागणी परिसरातील शेतकरी करीत आहेत.
या पाण्यामुळे शेतजमिनींची सुपिकता कमी होत आहे. माती खराब होत असून, पिकांचे उत्पादन घटले आहे. याशिवाय, गटाराच्या पाण्यामुळे परिसरात पसरलेली दुर्गंधी स्थानिक रहिवाशांसाठी डोकेदुखी ठरली आहे. शेतकऱ्यांनी पालखी महामार्ग प्रशासन व वरिष्ठ अधिकाऱ्यांकडे वारंवार तक्रारी केल्या मात्र, त्याची दखल घेतली गेली नाही. आम्ही संबंधित वरिष्ठ अधिकाऱ्यांकडे तक्रारी केल्या, पण अधिकाऱ्यांकडून केवळ आश्वासने मिळाली आहेत.
- दत्तात्रेय काटे, शेतकरी
01428