बारामतीसाठी ९८ लाखांचे अनुदान मंजूर
काटेवाडी, ता. ३० : कृषी विभागाच्या विविध योजनांतून बारामती तालुक्यातील २१,१३३ शेतकऱ्यांची निवड झाली आहे. यापैकी कागदपत्रे अपलोड केलेल्या शेतकऱ्यांना आतापर्यंत सुमारे ९८ लाख ८६ हजार रुपयांचे अनुदान मंजूर झाले आहे.
कागदपत्र अपलोडसाठी पेंडिंग प्रकरणे जास्त असल्याने शेतकऱ्यांनी तातडीने ऑनलाइन प्रक्रिया पूर्ण करावी, असे आवाहन तालुका कृषी अधिकारी सचिन हाके यांनी केले. महाडीबीटी यांत्रिकीकरण योजनेसाठी एकूण १७,५७६ शेतकऱ्यांची निवड झाली असली, तरी केवळ ३,२३० शेतकऱ्यांनी कागदपत्रे अपलोड केली आहेत. त्यापैकी ५०२ शेतकऱ्यांना ट्रॅक्टरसाठी पूर्वसंमती मिळाली असून, एकूण २, ०७५ शेतकऱ्यांना संमती देण्यात आली आहे. मात्र, १३,८७९ शेतकऱ्यांची कागदपत्रे अपलोड करण्यासाठी प्रक्रिया पेंडिंग आहे. योजनेतून आतापर्यंत १२४ शेतकऱ्यांना ८२.६२ लाख रुपयांचे अनुदान मिळाले आहे.
सिंचन सुविधा योजनेतून तालुक्यातील ३२०५ शेतकऱ्यांची निवड झाली आहे. त्यापैकी १,३४० शेतकऱ्यांनी कागदपत्रे अपलोड केली आहेत. ९६७ शेतकऱ्यांना पूर्वसंमती मिळाली असली, तरी १,५४४ जणांची प्रक्रिया पेंडिंग आहे. आतापर्यंत २४ शेतकऱ्यांना १६.२५ लाख रुपयांचे अनुदान मिळाले आहे.
भाऊसाहेब फुंडकर फळबाग लागवड योजनेत ३५२ शेतकऱ्यांची निवड झाली असली, तरी कागदपत्र अपलोड व पूर्वसंमतीची माहिती अद्याप उपलब्ध नाही. शेतकऱ्यांनी आधारकार्ड, ७/१२ उतारा व इतर कागदपत्रे तातडीने अपलोड करावीत, अन्यथा अनुदानाची संधी हातातून निघून जाईल. शेतकऱ्यांनी तातडीने कागदपत्रे अपलोड करून प्रक्रिया पूर्ण करावी, असे आवाहन तालुका कृषी विभागाने केले आहे.

