बारामतीत उद्यापासून उघड कापूस लिलाव
काटेवाडी, ता. १२ : बारामती कृषी उत्पन्न बाजार समितीच्या मुख्य आवारात यंदाच्या हंगामातील कापूस लिलाव शुक्रवारपासून (ता. १४) उघड पद्धतीने सुरू होणार आहेत. गतवर्षीप्रमाणे शेतकऱ्यांच्या मागणीनुसार हे लिलाव दर शुक्रवारी दुपारी १ वाजता होतील.
सध्या कापसाची काढणी आणि वेचणी हंगाम सुरू आहे. शेतकऱ्यांनी आपला कापूस चांगला वाळवून, स्वच्छ करून आणि ग्रेडिंग करून बाजारात आणावा, असे आवाहन सभापती विश्वास आटोळे आणि उपसभापती रामचंद्र खलाटे यांनी केले आहे.
बारामती मर्चन्ट असोसिएशनचे अध्यक्ष संभाजी किर्वे यांनी सांगितले की, स्थानिक आणि बाहेरील खरेदीदारांच्या उपस्थितीत लिलाव होतील.बाजार समितीत शेतमालाचे वजन लिलावापूर्वी केले जाते. गतवर्षी शेतकऱ्यांना कापसास योग्य दर मिळाले. लिलावात कापूस प्रतवारीनुसार विकला जातो. खासगी बाजारात विक्री करू नये, कारण तेथे पैसे आणि वजनाची हमी मिळत नाही, असे सचिव अरविंद जगताप यांनी सांगितले.

