दौंड तालुक्यात अवघे चारच जलतरण तलाव

दौंड तालुक्यात अवघे चारच जलतरण तलाव

प्रकाश शेलार
खुटबाव, ता. २५ : संपूर्ण दौंड तालुक्यात खासगी व शासकीय मिळून ४ जलतरण तलाव आहेत. त्यामुळे ऐन उन्हाळ्याच्या उकाड्यामध्ये तरुणाई, चिमुकले आपला जीव धोक्यात घालून विहीर, कालवा, नदी व‌ तलावामध्ये पोहताना दिसत आहेत.

दौंड शहरांमध्ये दौंड नगरपालिकेचा १, राज्य राखीव पोलिस बल -१ व ग्रामीण भागामध्ये केडगाव व यवत येथे खासगी मालकीचे प्रत्येकी १ असे एकूण चारच जलतरण तलाव आहेत. यामुळे भर उन्हाळ्यामध्ये अनेकजण धोक्याच्या ठिकाणी जाऊन पोहताना दिसत आहेत.

याशिवाय यवत परिसरामध्ये काही ऍग्रो टुरिझम पर्यटन केंद्रे आहेत. या प्रत्येक पर्यटन केंद्रामध्ये जलतरण तलाव आहे. त्याचा लाभ पर्यटन केंद्रास भेट देण्यात देण्यात आलेले प्रवासी घेताना दिसतात.
दौंड तालुक्याची लोकसंख्या ४ लाख ५० हजाराच्या आसपास आहे. एवढ्या मोठ्या लोकसंख्येला पोहण्यासाठी पुरेशा जलतरण तलावाची सुविधा नसल्याने येथील चिमुकले पर्यायी मार्गाचा वापर करताना दिसत आहेत. या पोहण्यावर नियंत्रण नसल्याने अनेकदा चिमुकल्यांनी जीव गमावण्याच्या घटना घडलेल्या आहेत.

दरम्यान, खासगी जलतरण तलावातील पोहणे हे सर्वसामान्यांसाठी परवडणारे नसून एका तासाला किमान ५० रुपये ते ७० रुपयांपर्यंत दर आहेत. यामुळे गरीब कुटुंबातील अनेक चिमुकले पोहण्यासाठी विहीर तलाव व कालव्याचा वापर करतात.

विहिरीत पोहताना अनेक जण १५ ते २० फूट उंचीच्या कठड्यावरून पाण्यामध्ये उडी मारतात. या उडीमुळे अनेक जीवघेण्या घटना घडलेल्या आहेत. त्यामुळे दरवर्षी पोहताना चिमुकल्याचा बुडून मृत्यू झाल्याची घटना घडते. तालुक्यामध्ये राहू, खामगाव, पारगाव, वरवंड, पाटस, खडकी, गोपाळवाडी, बोरीपार्धी, कानगाव ही मोठ्या लोकसंख्येची गावे आहेत. या गावांमध्ये किमान १ जलतरण तलाव असल्यास आसपासच्या गावातील मुले पोहण्यासाठी येथे येऊ शकतात. त्यामुळे या ४ जलतरण तलावावरती असलेला अतिरिक्त ताण कमी होण्यास मदत होईल.

जलतरण तलाव असणारी सोसायटी अद्याप तालुक्यात नाही- पुणे बारामती सारख्या शहरामध्ये उच्चभ्रू सोसायटीमध्ये अनेक जलतरण तलाव आहेत. परंतु दौंड शहर, केडगाव व यवत परिसरामध्ये अनेक सोसायट्यांचे बांधकाम झाले असले तरी या सोसायटीमध्ये अद्याप एकही जलतरण तलाव बांधण्यात आला नाही.


यवत हे तालुक्यातील सर्वाधिक लोकसंख्येचे मोठे गाव आहे. चिमुकल्यांची गरज ओळखून ४ वर्षांपूर्वी येथे जलतरण तलाव बांधला. आज नियमितपणे पोहण्याचे ५० पासधारक आहेत. याशिवाय उन्हाळा असल्याने तासवारी पद्धतीने पोहणाऱ्यांची संख्या लक्षणीय आहे. -चिंतन यादव, कोहिनूर जलतरण तलाव यवत

पूर्वी मुळा मोठा नदी व भीमा नदीचे उथळ पात्र असल्याने संपूर्ण नदीकाठची गावे नदीमध्ये पोहायला जायची. जलपर्णीची समस्या निर्माण झाली व नदीतील पोहणे बंद झाले. त्यामुळे आपल्या पाल्यांना पोहायला शिकवायचे कुठे हा मोठा प्रश्न आहे. अनेकदा वेळ व पैसा खर्च करून पारगाव पासून १० किलोमीटर अंतरावरती असणाऱ्या केडगाव येथील जलतरण तलावावरती पाल्यांना पोहण्यासाठी न्यावे लागते. स्थानिक प्रशासनाने पुढाकार घेऊन पारगाव येथे मुलांना पोहण्यासाठी जलतरण बांधावा. -राजेंद्र ताकवणे, पारगाव, ग्रामस्थ

ग्राफिक स्वरूपात
खासगी जलतरण तलाव पोहण्याचे दर-
(१) प्रति तास पोहणे- ५० रुपये
(२) नियमित मासिक पास-१३००
(३)२१ दिवसांचे कोचिंग क्लास-२५०० रुपये

शासकीय जलतरण तलाव पोहण्याचे दर
(१) प्रति तास पोहणे -४० रुपये
(२) मासिक पास- ६०० रुपये
(३) १ महिन्याचे कोचिंग क्लास- १६०० रुपये

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com