मुरमाड जमिनीत कडू कारल्याचा प्रयोग बनविला गोड

मुरमाड जमिनीत कडू कारल्याचा प्रयोग बनविला गोड

प्रकाश शेलार : सकाळ वृत्तसेवा
खुटबाव, ता. २३ : पारगाव (ता. दौंड) येथील विद्यमान सरपंच सुभाष बोत्रे व पत्नी सुरेखा बोत्रे या दाम्पत्याने एक एकर क्षेत्रामध्ये कडू कारल्याची गोड कहाणी तयार केली आहे. मुरमाड जमिनीमध्ये ठिबक सिंचनचा साह्याने कारल्याचा यशस्वी प्रयोग केला आहे. आत्तापर्यंत ७ तोडे झाले असून २ लाख रुपये उत्पन्न मिळाले आहे. अजून दीड महिना कारल्याचे उत्पादन निघणार असून सरासरी ५ लाख रुपये उत्पन्न मिळेल असा अंदाज व्यक्त केला जात आहे.


बोत्रे यांनी जानेवारी महिन्यामध्ये शेतीची नांगरट केली. जमिनीमध्ये पेरणीपूर्व कोंबड खताचा डोस दिला. त्यानंतर काकरणी केली व पाच फुटांचे पट्टा पद्धतीने बेड तयार केले. त्यानंतर ठिबक सिंचनचे पाइप अंथरण्यात आले. कारल्याच्या बियांचे रोपण आठवड्याभरानंतर रोप उगवण्यास सुरुवात झाली. त्यानंतर पेपर मल्चिंग करण्यात आले. सेंद्रिय खताचा वापर करण्यात आला. येणाऱ्या रोपाची वाढ व्हावी म्हणून ठिबकमधून औषधे सोडण्यात आली. ८ ते१० फूट रोपांची वाढ झाल्यानंतर सुतळी, लोखंडी जाळी व काठ्यांच्या साह्याने वेलीला आधार देण्यात आला.
दरम्यान, पीक चांगले येण्यासाठी कृषी तज्ञ महेंद्र ढमे, संपत बोत्रे व रामेश्वर गिराम यांचे सहकार्य मिळत आहे.

प्रतिकिलोला मिळतोय ४० ते ४५ रुपये बाजारभाव
मध्यंतरी पारगावमध्ये वादळी पाऊस झाल्यानंतर मजुरांच्या साह्याने पुन्हा नव्याने रोपांची बांधणी करण्यात आली. एक महिन्यापूर्वी कारल्याची विक्री सुरू झाली. तयार झालेला माल टेम्पोच्या साह्याने मांजरी येथील कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये पोहोचवण्यात आला. या फळभाजीची पुरेपूर वाढ झाली असून एका कारल्याचे सरासरी वजन ६० ते ८० ग्रॅम आहे. विशेष म्हणजे सध्या उन्हाळ्यामुळे या भाज्यांना मागणी असून प्रतिकिलो ४० ते ४५ रुपये बाजारभाव मिळाला आहे.


उशिरा लागवड झाल्याने पीक उशिरा येण्यास सुरुवात झाली. सध्या इतर ठिकाणी कारल्याचे पीक नसल्याने चांगला बाजार भाव मिळत आहे. कारल्याचा उपयोग भाजीपाला, मधुमेहाच्या रुग्णांसाठी साखर नियंत्रण‌ व औषधी वनस्पती म्हणून होत आहे. चालू वर्षी पारंपारिक उसाव्यतिरिक्त साडेपाच एकर जमिनीमध्ये २ हजार कांदा पिशवी व एक एकर जमिनीमध्ये काकडीचे यशस्वी उत्पादन घेतले आहे.
- सुभाष बोत्रे, कारल्याचे उत्पादक

आतापर्यंत मिळालेला बाजारभाव प्रतिकिलो
पहिला तोडा-४५० किलो....(४० रुपये)
दुसरा तोडा-५२० किलो..... (४३ रुपये)
तिसरा तोडा- ५७० किलो.... (४५ रुपये)
चौथा तोडा-८५० किलो....(४० रुपये)
पाचवा तोडा-७९० किलो..... (४३ रुपये)
सहावा तोडा ८२० किलो...(४२ रुपये)
सातवा तोडा ८४० किलो...(४५ रुपये)

01057, 21579

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com