ग्रामस्थांच्या योगदानातून उभारले काळभैरवनाथ मंदिर

ग्रामस्थांच्या योगदानातून उभारले काळभैरवनाथ मंदिर

खुटबाव (ता. दौंड) येथील काळभैरवनाथ मंदिर ग्रामस्थांच्या योगदानातून उभे राहिले आहे. खुटबाव येथील थोरात कुटुंबीय मूळचे वाळावणे (जि. अहमदनगर) येथील असून खूप वर्षांपूर्वी खुटबाव येथे स्थायिक झाले. गावातील भैरवनाथ मंदिर, महादेव मंदिर, हनुमान मंदिर हे सुरुवातीस खुटबाव रेल्वे स्टेशन नजीक होते. तसेच जुने खुटबाव गावही रेल्वे स्टेशन नजीक असल्याचे जाणकार सांगतात. तेथे अनेक जुन्या घरांचे आजही अवशेष आढळतात. हळू हळू खुटबाव विस्तारण्यास सुरुवात झाली. त्यानंतर कै. जयवंतराव थोरात, कै. शंकरराव थोरात व‌ कै. रामभाऊ थोरात यांनी गावामध्ये भैरवनाथाचे मंदिर बांधले.


१९६४ मध्ये भैरवनाथ मंदिराचा पहिला जीर्णोद्धार करण्यात आला. या कामी वसंत अप्पा थोरात, वसंत अण्णा थोरात, कल्याण ढमढेरे, हरिदास अण्णा थोरात, जगन्नाथ गरुड, के. टी. अप्पा थोरात यांनी पुढाकार घेतला. त्यानंतर २००८ मध्ये सुमारे साडेदहा लाख रुपये खर्चून भैरवनाथ जोगेश्वरी मंदिराचा दुसरा जीर्णोद्धार करण्यात आला. चालू वर्षी २०२४ मध्ये सहा लाख रुपये खर्च करून मूर्तीची प्राणप्रतिष्ठापना करण्यात आली. गावातील शिवाजी दळवी हे दररोज देवाची पूजाअर्चा करतात. मंदिर दक्षिणमुखी असून मंदिराच्या आतमध्ये गाभारा व भाविकांना बसण्यासाठी सभागृह आहे. मंदिराच्यावरती मुख्य एकच कळस असून प्रवेशद्वारावरही भैरवनाथ प्रसन्न असे लिहिले आहे. दरवर्षी चैत्र शुद्ध नवमीला या गावची यात्रा भरते. दोन दिवस भरणाऱ्या यात्रेमध्ये काळभैरवनाथ जन्मोत्सव, अभिषेक, देवाचा पोशाख, तमाशा ऑर्केस्ट्रा व कुस्त्यांचा जंगी आखाडा आदींचे आकर्षण असते. यावेळी संपूर्ण महाराष्ट्रातून भाविक आपला नवस फेडण्यासाठी येतात.

गावाचे नाव राज्यभर
१९७६ मध्ये महाविद्यालयीन जीवन सोडून रमेश थोरात पहिल्यांदा वयाच्या पंचविसीमध्ये सरपंच झाले. त्यानंतर त्यांनी सरपंच पदाची हॅटट्रिक केली. सर्व ग्रामपंचायत निवडणुका बिनविरोध करण्याचा सपाटा लावला. आजतागायत या गावाने सलग ५० वर्षे बिनविरोध निवडणुका करण्याचा सुवर्ण महोत्सव साजरा केला आहे. याशिवाय गावातील सोसायटी, पतसंस्था, दूध संस्था बिनविरोध करण्याचा पायंडा आहे.

खुटबाव एक शैक्षणिक हब
अध्यक्ष रमेश अप्पा थोरात यांच्या प्रयत्नातून १९८४ मध्ये भैरवनाथ शिक्षण संस्थेची स्थापना झाली. सध्या भैरवनाथ विद्यालयाचे १७००, इरा इंग्लिश मीडियम स्कूल ६०० व पोपटराव किसनराव थोरात महाविद्यालयाचे ६०० विद्यार्थी या गावांमध्ये शिक्षण घेत आहेत. परिसरातील १५ गावांतील अनेक विद्यार्थी या ठिकाणी शिक्षणासाठी येत आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com