पेट्रोल पंपावरील स्वच्छतागृह स्वच्छ ठेवण्याची मागणी
खुटबाव, ता. २० : पेट्रोल पंपावर बांधण्यात आलेली स्वच्छतागृहे स्वच्छ ठेवावीत, अशी मागणी प्रवाशांकडून होत आहे. पुणे जिल्ह्यामध्ये अनेक पेट्रोल पंपामध्ये स्वच्छतागृह अस्वच्छ असल्याची वस्तुस्थिती आहे. अपवादात्मक परिस्थितीमध्ये काही पेट्रोल पंपचालक स्वच्छतागृह स्वच्छ ठेवत आहेत.
पेट्रोल पंप चालकाने संबंधित स्वच्छतागृहाची सुविधा प्रवाशांना देणे बंधनकारक आहे. याशिवाय पंपावर अनेकदा पिण्याचे पाणी, मोफत टायरमध्ये हवा या गोष्टीकडे दुर्लक्ष केले जाते. तसेच, पंपामध्ये प्रथमोपचार पेटी व अग्निशमन किट सुविधा देणे गरजेचे आहे. पेट्रोल व डिझेलचे दैनंदिन दरफलक लावणे गरजेचे आहे. मात्र, अनेक ठिकाणी या गोष्टींकडे दुर्लक्ष केले जात आहे.
या संदर्भात ग्रामस्थ विश्वास ताकवणे यांनी सांगितले की, ‘‘पेट्रोल पंपावरील स्वच्छतागृहांची स्वच्छता हा महत्त्वाचा विषय आहे. यावर्षी कुणाचेही नियंत्रण नसल्याचे आढळून आले आहे. त्यामुळे प्रशासनाने पंपावर स्वच्छतागृह, प्रथमोपचार पेटी, पिण्याचे पाणी, अग्निशमन बॉक्स, टायरमध्ये हवा या सुविधा मोफत उपलब्ध करून देणे गरजेचे आहे.’’