सर्जा-राजांच्या संभाळल्या पाच दशकांत २० जोड्या
खुटबाव, ता.२०: कडेठाण (ता. दौंड ) येथील ९६ वर्षीय करडे आबा यांनी पाच दशके बैलांशी मैत्री अखंडपणे जोपासली आहे. या ५० वर्षात आबांनी २० बैल जोड्या पोटच्या मुलांप्रमाणे सांभाळल्या आहेत. आजही त्यांची काळ्या आईची सेवा अविरतपणे सुरू आहे. अंगामध्ये पांढराशुभ्र कुर्ता, धोतर, मोठ्या पल्लेदार मिशा, डोक्याला फेटा, खांद्यावर आसूड, पाठीचा पोक निघालेले व अनवाणी असणारे हे जुने जाणते व्यक्तिमत्त्व बैलप्रेमी करडे आबा म्हणून परिसरात प्रसिद्ध आहेत.
श्यामकिसन शंकर करडे उर्फ बार्शीकर आबा असे त्यांचे नाव आहे.मूळचे येरमाळा (ता .बार्शी, जि. सोलापूर) येथील आहेत. ते ५० वर्षापूर्वी कडेठाण येथे रोजगाराच्या शोधार्थ आले होते. शेतीत रोजंदारीवर कामे करता करता, आबांनी मिळालेल्या भांडवलावर दोन बैल विकत घेतले. दररोज भल्या पहाटे उठून शेतांमधली नांगरणी, मेहनत,पाळी घालणे, बियांची पेरणी ही कामे बैलांच्या साह्याने करण्यास सुरुवात केली. या बैलांना सकस आहार खाऊ घालणे, त्यांच्याकडून मेहनतीची कामे करून घेणे. मिळालेल्या पैशातून कुटुंबाची गुजरात करणे हा आबांचा नित्यक्रम आहे. आज त्यांच्याकडे सर्जा- राजा नावाचे दोन देखणे बैल बैल आहेत. या बैलांशी मैत्री असल्याने आबांनी त्यांना चांगल्या सवयी लावल्या आहेत. गावातील विठ्ठल दिवेकर या शेतकऱ्याची १२ एकर शेती आबा निरंतरपणे ४० वर्षे वाट्याने देखील करतात. मेहनतीच्या जोरावर गावांमध्ये जागा घेऊन त्यामध्ये छोटीसे पत्र्याचे घर बांधले आहे. विज्ञान युगात ट्रॅक्टर सगळीकडे असताना बैलांशी मैत्री करणारे आबा हे दुर्मिळ उदाहरण आहे.
आजही भल्या पहाटे माझा दिवस सुरू होतो. दिवसभर शेतामध्ये काम करत असतो .त्यामुळे शरीराला कष्ट पडते. त्यामुळे अद्यापपर्यंत कसलाही आजार नाही. कसलीही गोळी चालू नाही. कष्ट हेच भांडवल समजून ५० वर्षांपासून प्रामाणिकपणे कडेठाण परिसरातील शेतकऱ्यांना सेवा देण्याचे काम करीत आहे.
- श्यामकिसन शंकर करडे ऊर्फ बार्शीकर आबा
कष्टकरी शेतकऱ्यांना न्याय मिळावा
श्यामकिसन शंकर करडे ऊर्फ बार्शीकर म्हणाले की, शासन आपल्या वृत्तवाहिन्या व वृत्तपत्राच्या जाहिरातीमध्ये त्याच त्या शेतकऱ्यांचे फोटो वापरत आहेत. माझ्यासारख्या कष्ट करणाऱ्या शेतकऱ्यांचा फोटो दिल्यास हा माझ्यासाठी मोठा सन्मान ठरेल. खऱ्या कष्टकरी शेतकऱ्यांना न्याय मिळाला अशी भावना सर्वदूर पोहोचेल.
02915, 02916