देलवडीतील साक्षी, भाग्यश्रीची खाकी वर्दीला गवसणी

देलवडीतील साक्षी, भाग्यश्रीची खाकी वर्दीला गवसणी

Published on

खुटबाव, ता. २८ : देलवडी (ता. दौंड) येथील सर्वसामान्य मजूर कुटुंबातील दोन युवती नवदुर्गा नवरात्र काळामध्ये पोलिस भरती झाल्या आहेत. यामध्ये साक्षी माने हिची संभाजीनगर कारागृह पोलिस तर भाग्यश्री अडागळे हिची मुंबई पोलिस (चालक) म्हणून निवड झाली आहे. प्रतिकूल परिस्थितीतील त्यांच्या यशामुळे ग्रामस्थांकडून कौतुकाचा वर्षाव होत आहे.
साक्षीचे वडील सोमनाथ माने आणि आई वंदना हे स्वतःची ३० गुंठे शेती सांभाळत मजुरी काम करतात. आजोबा नारायण माने व पालकांनी साक्षीला लहानपणापासूनच शिक्षणासाठी पाठिंबा दिला. तिचे पहिली ते सातवीपर्यंतचे शिक्षण जिल्हा परिषद प्राथमिक शाळा देलवडी येथे झाले. दहावीपर्यंत शिक्षण जय मल्हार विद्यालय देलवडी येथे झाले. त्यानंतर खुटबाव येथील भैरवनाथ विद्यालयात उच्च शिक्षण घेतले. बारावी पूर्ण झाल्यानंतर तिने केडगाव येथील संदीप टेंगले यांच्या समर्थ ॲकॅडमी मध्ये पोलिस भरतीचा सराव केला. घरकाम सांभाळत दिवसातून वेळ मिळेल तेव्हा अभ्यास केला. पहिल्याच प्रयत्नामध्ये वयाच्या १९ व्या वर्षी १५० पैकी १०८ गुण मिळवत तिने कारागृह पोलिस पदाला गवसणी घातली.
भाग्यश्रीचे वडील सुदाम अडागळे व आई अविदा हे मजुरीचे काम करतात. मोठी बहीण स्वाती हिने भाग्यश्रीचा शैक्षणिक खर्च भागवताना स्वतः खासगी नोकरी केली. भाग्यश्रीने गावातील जिल्हा परिषद प्राथमिक शाळा देलवडी व जय मल्हार विद्यालय देलवडी शाळेत दहावीपर्यंत शिक्षण घेतले. त्यानंतर खुटबाव येथील भैरवनाथ विद्यालयात बारावी उत्तीर्ण झाली. सुभाष बाबूराव कुल महाविद्यालय केडगाव येथे पदवीपर्यंत शिक्षण पूर्ण केले. हडपसर येथे विनोद माने यांच्या स्वराज्य ॲकॅडमीमध्ये पोलिस भरतीचा दोन वर्षे सराव केला. नुकत्याच झालेल्या मुंबई पोलिस भरती परीक्षेमध्ये १५० पैकी ११७ गुण मिळवत तिने गुणांकन यादीत स्थान पटकाविले. वयाच्या २३ व्या वर्षी मुंबई पोलिसमध्ये चालक म्हणून तिला रुजू करण्यात आले आहे.

ऐन नवरात्रीमध्ये पोलिस होण्याचे भाग्य आम्हाला लाभले, त्यामुळे स्वतःला नशीबवान समजतो. मिळालेले यश कुटुंबीय व देलवडी ग्रामस्थांना समर्पित करतो. भविष्यात खात्या अंतर्गत परीक्षा देऊन पदोन्नती घेणार आहे. आम्हाला पाठिंबा आणि सहकार्य करणाऱ्या सर्वांचे मनःपूर्वक आभार.
साक्षी माने, भाग्यश्री अडागळे

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com