उजाड माळरानावर हिरवाईचा संकल्प
खुटबाव, ता. ७ : पारगाव (ता. दौंड) येथील उजाड माळरानावर ५००० करंज रोपे लावण्याचा संकल्प युवकांनी केला आहे. यावेळी करंज वनस्पतीचे गाव म्हणून जिल्हाभर नावलौकिक करण्याचा संकल्प ग्रामस्थांनी केला आहे.
आयुष्मान मंत्रालय भारत सरकार अंतर्गत सर परशुरामभाऊ महाविद्यालय पुणे, ग्रामपंचायत पारगाव, विवेक विचार मंच व हिंदू जनजागरण समितीच्या वतीने आयोजन करण्यात आले. पहिल्या टप्प्यामध्ये १००० रोपे लावण्याचा प्रारंभ करण्यात आला.
यावेळी सरपंच सुभाष बोत्रे, माऊली ताकवणे, सयाजी ताकवणे, सर्जेराव जेधे, डॉ. पोपट शिंदे, सुशील ठिगळे, डॉ. यशवंत खताळ, मनोहर गुंड, महेश शेळके, विजय चव्हाण, सचिन ताकवणे, शरद शिशुपाल, नीलेश बोत्रे, रामकृष्ण ताकवणे, प्रियांका बोत्रे, बाजीराव तांबे, किरण ढमढेरे, वैभव जावळे, सचिन कोकणे आदी उपस्थित होते.
सर परशुराम भाऊ महाविद्यालयातील १०० युवक व युवतींनी न्यू इंग्लिश स्कूल पारगावच्या पाठीमागील जागेमध्ये रविवारी (ता. ५) वृक्षारोपण केले. ग्रामस्थ प्रकाश ताकवले व सचिन रणदिवे यांनी अन्नदान दिले. पारगाव ग्रामपंचायतीने मोफत टॅंकर उपलब्ध करून पाण्याची व्यवस्था केली. अभिषेक खळदकर यांनी अल्पदरात खड्डे खणण्याचे मशिन उपलब्ध केले.
यावेळी कार्यक्रम अधिकारी डॉ. पोपट शिंदे म्हणाले की, ‘‘वृक्ष लागवडी पूर्वी दोन वेळा पारगावला भेट दिली. ग्रामस्थांची बैठक घेतली. चांगला प्रतिसाद येईल असे वाटल्यानंतर गावाची निवड केली. गावाने वृक्ष संगोपनाची जबाबदारी घेतल्यानेच पारगावची निवड करण्यात आली.’’
पारगाव हे उपक्रमशील गाव म्हणून जिल्ह्यामध्ये प्रसिद्ध आहे. गावामध्ये ५००० करंजाची झाडे लागत असल्याने वेगळेच समाधान आहे. करंज ही वन औषधी व बहुआयामी वनस्पती म्हणून प्रसिद्ध आहे. भविष्यात गावची ओळख करंजाचे गाव म्हणून करण्यासाठी प्रयत्नशील आहोत.
- महेश शेळके, वृक्षप्रेमी
02979