भांडगावच्या चिमुकल्यांकडून पूरग्रस्तांच्या दुःखावर फुंकर
खुटबाव, ता. ८ ः भांडगाव (ता. दौंड) येथील ऑलंम्पस स्कूलमधील चिमुकल्यांनी मराठवाडा येथील पूरग्रस्तांसाठी खारीचा वाटा उचलत १५० जीवनावश्यक वस्तूंचे किटचे वाटप करत त्यांच्या दुःखावर फुंकर घातली आहे. धाराशिव जिल्ह्यातील, परांडा तालुक्यातील वाडेगव्हाण , लोहारा व आकुलगाव या गावी शाळेचे पदाधिकारी व कर्मचाऱ्यांनी स्वतः जाऊन किट वाटले.
शाळेच्या संचालिका भक्ती शेवाळे यांनी विद्यार्थी व पालकांना आवाहन केले होते. यामधून चार टन गहू व ज्वारीचे धान्य जमा झाले. या धान्याचे शाळेच्या कर्मचाऱ्यांनी स्वतः निसण व टिपण केले. शाळेने गिरणीतून या धान्यापासून दळलेले पीठ तयार केले. या पीठाबरोबरच साबण, तांदूळ, मूगडाळ, तूरडाळ, हरभरा, चहा पावडर, साखर, गूळ, मसाले, गोडेतेल, खोबरेल तेल, कडधान्य या पदार्थांचे १५० किट करत गरजू पूरग्रस्तांना वाटले. याबरोबरच छत्री, कपडे, ब्लॅंकेट, चटई व साडी या वस्तूंचे वाटप करण्यात आले. या कामी शाळेचे विद्यार्थी, संस्थाचालक, शालेय शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी, पालक व शाळेचे हितचिंतक यांनी योगदान दिले.
02988