ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांनी अनुभवली ‘नासा’ सफर
प्रकाश शेलार ः सकाळ वृत्तसेवा
खुटबाव, ता. २ : जिल्ह्यातील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेमध्ये शिक्षण घेणाऱ्या भावी अंतराळवीर व वैज्ञानिक विद्यार्थ्यांनी अमेरिकेतील नासा संस्थेला भेट दिली. बारा दिवसांच्या या अभ्यास दौऱ्याने ग्रामीण भागातील २५ विद्यार्थी अक्षरशः भारावून गेले. जिल्हा परिषद पुणे यांच्या पुढाकारातून हा उपक्रम राबवण्यात आला. महाराष्ट्रामध्ये विद्यार्थ्यांसाठी नासा संस्थेची भेट राबविणारी पुणे जिल्हा परिषद ही दुसरी उपक्रमशील जिल्हा परिषद ठरली आहे.
विभागीय आयुक्त डॉ. चंद्रकांत पुलकुंडवार, मुख्य कार्यकारी अधिकारी गजानन पाटील, प्राथमिक शिक्षणाधिकारी संजय नाईकडे यांच्या पुढाकारातून हा अभ्यास दौरा घेण्यात आला. शेतकरी कुटुंबातील विद्यार्थ्यांना पहिल्यांदाच विमानात बसण्याचा अनुभव मिळाला. अमेरिकेतील महत्त्वाची वैज्ञानिक केंद्रे व अंतराळातील महत्त्वपूर्ण घडामोडींचा अभ्यास या दौऱ्यामुळे झाला. मुंबई- अबुधाबी- व्हाया वॉशिंग्टन असा प्रवास करत विद्यार्थी अमेरिकेत दाखल झाले. यावेळी पुण्यातील आयुका संस्थेचे शास्त्रज्ञ समीर दुरडे विद्यार्थ्यांसोबत उपस्थित होते.
विद्यार्थ्यांनी अनुभवलेली अभ्यास केंद्रे पुढीलप्रमाणे ः
१६ नोव्हेंबर
या दिवशी विद्यार्थ्यांनी उद्वार हेझी एअर अँड स्पेस म्युझियमला भेट दिली. या ठिकाणी पहिल्या व दुसऱ्या महायुद्धातील विमाने ठेवली होती. यावेळी राइट बंधूंनी बनवलेले पहिले विमान विद्यार्थ्यांनी पाहिले. सर्वाधिक वेगाने धावणारे हिरोशिमा शहरावर बॉम्ब हल्ला करणारे अनोलॉ गे विमान पाहिले. फ्रान्स एअरलाइन्सचे कॉन कॉर्ड विमान व बोइंग विमान पाहिले. नुकतेच उड्डाण केलेले डिस्कवरी स्पेस शटल पाहिले. त्यानंतर विद्यार्थ्यांनी अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षाचे निवासस्थान असणारे व्हाइट हाऊस बाहेरून पाहिले. ज्या ठिकाणी संविधान ठेवले जाते ते ठिकाण नॅशनल आर्चिज बिल्डिंग पाहिली. अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष जॉर्ज वॉशिंग्टन व अब्राहम लिंकन तसेच अल्बर्ट आइन्स्टाईन यांच्या मेमोरिअल ठिकाणाला भेट दिली.
१७ नोव्हेंबर-
इंडियन ॲम्बेसी या ठिकाणी भारतीय राजदूत विनायक क्वात्रा यांनी विद्यार्थ्यांशी संवाद साधला. त्यानंतर त्यांनी अर्थ इन्फॉर्मेशन सेंटरला भेट दिली. या ठिकाणी पृथ्वीबाबत वेगवेगळी माहिती देण्यात आली. वैज्ञानिक मार्क सुबाराव यांनी समुद्रातील लाटांबद्दल विद्यार्थ्यांना माहिती दिली. समुद्रातील पाण्याची पातळी वाढत असल्याचे त्यांनी यावेळी अधोरेखित केले.
१८ नोव्हेंबर
विद्यार्थ्यांनी स्मिथ सोनियन नॅशनल एअर ॲंड स्पेस म्युझियमला भेट दिली. या ठिकाणी अंतराळ संशोधनाबद्दल माहिती देण्यात आली. अंतराळवीरांनी चंद्रावरून आणलेला दगडाला विद्यार्थ्यांनी स्पर्श केला.
१९ नोव्हेंबर
फ्लोरिडा राज्यामध्ये असणाऱ्या ओर्लेंडो शहरातील डिज्नीलैंड या ठिकाणाला भेट दिली. हे ठिकाण विद्यार्थ्यांच्या आवडीचे ठरले. यावेळी स्थानिकांनी कार्टूनचे कपडे घालत वेगवेगळ्या कलाकृती केल्या होत्या. यावेळी विद्यार्थ्यांनी पाण्यातून सफर केली. तसेच, अनेक धाडसी खेळ घेण्यात आले.
२० नोव्हेंबर
या दिवशी विद्यार्थ्यांनी नासा या संस्थेला भेट दिली. केनडी स्पेस सेंटरमध्ये वेगवेगळ्या ऐतिहासिक मोहिमेत अंतराळामध्ये गेलेली वेगवेगळे रॉकेट दाखवण्यात आली. ग्रहावर उतरल्यावर कसे वाटेल, यासाठी व्हर्च्युअल रियालिटी हेडसेट वापरत प्रत्यक्षात विद्यार्थ्यांना अनुभव देण्यात आला.
२१ नोव्हेंबर
ओर्लंडो या ठिकाणी एस्ट्रोनॉट ट्रेनिंग सेंटरला भेट दिली. यामध्ये विद्यार्थ्यांना वेगवेगळे अंतराळातील अनुभव देण्यात आले. टीम वर्क, कंट्रोल रूम, संवाद या गोष्टी अंतराळ सफारीमध्ये किती महत्त्वाचे असतात हे सांगण्यात आले. मंगळ ग्रहावरील दगड उचलण्याचा अनुभव विद्यार्थ्यांना देण्यात आला.
२२ नोव्हेंबर
ऑर्लंडो ते सॅन फ्रांसिस्को प्रवास
२३ नोव्हेंबर
विद्यार्थ्यांनी सॅनफ्रान्सिस्को कॅलिफोर्निया या ठिकाणाला भेट दिली. या ठिकाणी विद्यार्थ्यांना अनेक भारतीय लोक भेटले. त्यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. कॉम्प्युटर हिस्टरी म्युझियम व टेक इटर ॲक्टिव म्युझियम या ठिकाणी विद्यार्थ्यांनी भेट दिली. त्या ठिकाणी प्रगत रोबोटशी संवाद साधला. कोडिंग किती प्रगत झाले आहे, या संदर्भात मार्गदर्शन घेतले.
२४ नोव्हेंबर
या दिवशी सेंट फ्रान्सिस्को सिटी टूर करण्यात आली. गोल्डन गेट ब्रिज, लोम्बार्ड स्ट्रीट, कॅलिफोर्निया सायन्स सेंटर आदी प्रेक्षणीय स्थळे विद्यार्थ्यांनी पाहिली. कॅलिफोर्निया सायन्स सेंटर या ठिकाणी भेट दिल्यानंतर तेथे प्लॅनेट शो दाखवण्यात आला. त्यामध्ये नक्षत्रे कशी तयार झाली, याची माहिती होती. त्याचप्रमाणे त्या ठिकाणी रेन फॉरेस्ट असा विभाग होता. त्यात वेगवेगळी जिवंत फुलपाखरे वेगवेगळे किटके मुक्तपणे फिरत होती. तसेच, एका केंद्रात भूकंप आल्यानंतर जी परिस्थिती असते त्याचा अनुभव देण्यात आला.
२५ नोव्हेंबर
स्टॅन्ड फोर्ड युनिव्हर्सिटी भेट दिली. या ठिकाणी विद्यार्थ्यांनी भारतीय वंशाचे प्राध्यापक कौस्तुभ सुपेकर यांच्याशी संवाद साधला. या युनिव्हर्सिटीमध्ये प्रवेश कसा मिळू शकतो? या संदर्भात मार्गदर्शन घेतले. विद्यार्थ्यांनी कॅलिफोर्निया येथील ॲपल व गुगल सेंटरला भेट दिली. येथे शास्त्रज्ञ जयंत नारळीकर यांच्या कन्या गिरिजा नारळीकर या गुगल संस्थेमध्ये कार्यरत आहेत. गुगल कशाप्रकारे काम करते, या संदर्भात गिरिजा यांनी विद्यार्थ्यांशी संवाद साधला. गुगलचे हेडक्वार्टर असणारे सुंदर पीचाई यांचे कार्यालय विद्यार्थ्यांनी बाहेरून पाहिले.
२७ नोव्हेंबर
त्यानंतर विद्यार्थ्यांनी २५ तारखेला परतीचा प्रवास सुरू केला. २७ तारखेला बंगलोर येथे आयुक्त व इस्रोच्या शास्त्रज्ञांची भेट घेतली.
विद्यार्थी ठरले कौतुकास पात्र
वॉशिंग्टन डीसी येथे स्मिथ सोनियन नॅशनल एअर ॲंड स्पेस म्युझियमला भेटीच्यावेळी भारतीय विद्यार्थ्यांनी दाखवलेली शिस्त, साधलेला संवाद पाहून स्थानिक शिक्षक व अधिकाऱ्यांनी विद्यार्थ्यांच्या शिस्तीचे शाब्दिक कौतुक केले. भविष्यामध्ये अंतराळवीर व शास्त्रज्ञ बना यासाठी शुभेच्छा दिल्या.
हा आमच्यासाठी अविस्मरणीय प्रसंग आहे. ज्या गोष्टी, ठिकाणे संगणक व मोबाईलमध्ये पाहिली ती प्रत्यक्षात अनुभवास मिळाली याचा अत्यानंद आहे. प्रवासामध्ये अमेरिकन अधिकारी व ग्रामस्थांचा सुखकारक अनुभव आला. जिल्हा परिषद पुणे यांनी आमच्यासाठी बालवयामध्ये अमेरिकेचा अभ्यास दौरा दिला याबद्दल भावी शास्त्रज्ञांच्या वतीने सर्वांचे मनःपूर्वक आभार!
- स्पृहा खेडेकर, नासा संस्थेला भेट दिलेली विद्यार्थिनी
03128
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

