गलांडवाडीत श्रमदानातून साकारला वनराई बंधारा

गलांडवाडीत श्रमदानातून साकारला वनराई बंधारा

Published on

खुटबाव, ता. ८ : गलांडवाडी (ता. दौंड) येथील २०० महिला व ग्रामस्थांनी जलसंवर्धनासाठी वनराई बंधारा बांधला आहे. रविवारी (ता. ७) सात मोरी परिसरातील ओढ्यावर दिवसभर श्रमदान करून संपूर्ण गावाने हा प्रकल्प साकारला आहे. या बंधाऱ्यामुळे तीन लाख लिटर पाणी साठवले जाणार आहे.
यासाठी सुरुवातीस ग्रामस्थांनी प्लास्टिक गोण्यांमध्ये माती भरली. एकूण ४०० गोण्या मातीने भरल्यानंतर ट्रॅक्टरद्वारे वाहतूक करत या गोण्या सात मोरी परिसरात आणण्यात आल्या. येथे ग्रामस्थांनी विशेषतः: महिलांनी सर्वप्रथम श्रमदान करीत ओढ्याचे खोलीकरण केले. त्यानंतर जेसीबीच्या साह्याने पुन्हा खोलीकरण करण्यात आले. पाणी अडवण्यासाठी सुरुवातीस एकावर एक दगड रचण्यात आले. त्यानंतर मातीने भरलेल्या गोण्या दगडावर रचण्यात आल्या. यावेळी ज्योती शितोळे, योगिता शेंडगे, सुनीता छाजेड, रोहिणी शेंडगे, अपेक्षा चव्हाण, मंगल गायकवाड, अपर्णा चव्हाण, विद्या मुळीक, संगीता चव्हाण, नेहा भापकर, सविता देवकर, सुनीता चव्हाण, नीता चव्हाण, छबूबाई जाधव, शोभा मांढरे, ज्योती चव्हाण, वैशाली चव्हाण, ताराबाई कर्जत, रूपाली थोरात, स्वाती शेलार, रंजना पवार, दीपाली चव्हाण या महिलांनी आपली दैनंदिन कामे बाजूला ठेवत दिवसभर श्रमदान केले. यावेळी ग्रामस्थ ज्योती शितोळे म्हणाल्या की, सरपंच रमेश पासलकर, ग्रामसेवक संदीप ढवाण यांच्या नेतृत्वाखाली भूजल पातळी वाढवण्यासाठी ग्रामपंचायत गलांडवाडीने विहीर पुनर्भरण, १०० शोष खड्डे घेणे, जलतारा निर्मिती आदी उपक्रम हाती घेतले आहेत. आगामी आठवड्यामध्ये पाणंद रस्ता तयार करायचा आहे. श्रमदानातून गावाचा कायापालट करण्यासाठी ग्रामस्थ एकवटले आहेत.

3141

Marathi News Esakal
www.esakal.com