मेट्रो यवतपर्यंत करण्याची मागणी
खुटबाव, ता. १३ : पुणे मेट्रोचा लोणी काळभोरपर्यंत झालेला विस्तार यवतपर्यंत नेण्याची मागणी आमदार अॅड. राहुल कुल यांनी नागपूर येथील हिवाळी अधिवेशनात केली. सार्वजनिक बांधकाम मंत्री (सार्वजनिक उपक्रम) दादा भुसे यांनी या विस्तारासाठी आवश्यक तांत्रिक अडचणी दूर करण्यासाठी बैठक घेण्याची व पुढील कार्यवाही करण्याचे आश्वासन दिले.
हिवाळी अधिवेशनात आमदार कुल यांनी पुणे जिल्हा आणि परिसरातील महत्त्वाच्या रस्ते, उन्नत मार्ग व मेट्रो प्रकल्पांच्या अंमलबजावणीसंदर्भात उपस्थित लक्षवेधी मागणी केली. त्यात अंतर्गत व बाह्य रिंगरोड आणि उन्नत मार्गांची कामे वेळेत व वेगाने करण्याची विनंती केली. यावर मंत्री भुसे म्हणाले कि, पूर्व रिंगरोडच्या १२ पैकी ९ पॅकेजचे काम सुरु झाले असून, उर्वरित ३ पॅकेजची निविदा अंतिम टप्प्यात आहे. पश्चिम रिंग रोडच्या ५ पॅकेजची कामे वेगाने सुरू आहेत. यामुळे शहरातील वाहतुकीचा ताण कमी होण्यास मदत होईल. पुणे- सोलापूर मार्गावरील हडपसर ते यवत आणि पुणे- नगर मार्गावरील पुणे ते शिरूर या उन्नत मार्गांसाठीची निविदा प्रक्रिया अंतिम टप्प्यात असून, लवकरच कामांना सुरुवात होईल. तसेच, पुणे- सोलापूर, पुणे- अहिल्यानगर आणि पुणे- राजगुरुनगर या मार्गांवर वाहतूक सुरळीत करण्यासाठी आवश्यक अतिरिक्त ‘साईड लेन’ विकसित करण्यात येईल. एमएसआरडीसीचे रिंग रोड, पीएमआरडीए इनर रिंग रोड आणि मेट्रो प्रकल्पांचे एकात्मिक नियोजन केले जाईल, जेणेकरून वाहतूक व्यवस्था अधिक प्रभावी बनेल. पुणे ते छत्रपती संभाजीनगर या ग्रीन फिल्ड प्रकल्पाचे भूसंपादन सध्या चालू आहे. तळेगाव- चाकण- शिक्रापूर मार्गाच्या कामासाठीची निविदा प्रक्रिया अंतिम टप्प्यात आहे. खडकवासला बंदनळी कालव्यामुळे पुणे शहरात मोकळ्या झालेल्या जमिनीचा वापर वाहतूक नियोजनासाठी करण्याबाबत सकारात्मकता दर्शविण्यात आली.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

