अज्ञात वाहनाच्या धडकेत तिघांचा मृत्यू
कुरकुंभ, ता. २५ : पुणे-सोलापूर राष्ट्रीय महामार्गावर दौंड तालुक्यातील पांढरेवाडी हद्दीतील मुकादमवाडी येथे रविवारी (ता. २४) मध्यरात्री भरधाव अज्ञात वाहनाने एका दुचाकीला व पायी जाणाऱ्या व्यक्तीला धडक दिल्याने तीन जणांचा मृत्यू झाला, तर तीन जण गंभीर जखमी झाले. अपघातातील मृतांत एकाच कुटुंबातील एक महिला व एका पुरुषाचा समावेश आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, महामार्गावर पांढरेवाडी हद्दीतील मुकादमवाडी उड्डाण पुलाजवळ रविवारी (ता. २४) मध्यरात्री पुणे बाजूकडून सोलापूरकडे जाणाऱ्या अज्ञात वाहनाने एका दुचाकीला व एका पायी जाणाऱ्या व्यक्तीला धडक दिली. या अपघातात दुचाकीवर प्रवास करणारे आरिफ सय्यद मुलाणी व मुना सय्यद मुलाणी (रा. देवळी, ता. मोहाळ, जि. सोलापूर) या एकाच कुटुंबातील दोघांचा गंभीर जखमी झाल्याने मृत्यू झाला. आणखी एक पायी जाणारे अमयान सादिक खान (रा. जौनपूर, उत्तर प्रदेश) या व्यक्तीचा गंभीर जखमी झाल्याने मृत्यू झाला. तर, सुरेश एकनाथ राऊत व गणेश मधुकर शहाण (रा. निमगाव केतकी, ता. इंदापूर) हे दोन जण जखमी झाले. जखमींना उपचारासाठी दौंड येथील खासगी रूग्णालयात दाखल केले आहे.
हा अपघात एवढा भयानक होता की मृत महिलेचा मृतदेह वाहनात अडकून दीड किलो मीटर अंतरावरील कुरकुंभ औद्योगिक वसाहतीच्या कार्यालयासमोर महामार्गावर अढळून आला. या मृतदेहावरून महामार्गावरील अनेक वाहने गेल्याने शरीराचा चेंदामेंदा झाला होता. अपघातातील आणखी एका जखमीचे नाव समजू शकले नाही.
अपघातासंदर्भात सादिक शौकत मुलाणी यांनी पोलिसात फिर्याद दिली. पोलिसांनी याप्रकरणी सोमवारी अज्ञात वाहन व चालकाविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. अपघातातील अज्ञात वाहनाबाबत अधिक माहिती असल्यास दौंड पोलिसांशी ०२११७/२६२३३३ या क्रमांकावर संपर्क साधावा. अपघाताचा पुढील तपास सहायक पोलिस निरीक्षक तुकाराम राठोड करीत आहेत.