केळी पिकावर करप्या रोगाचा प्रादुर्भाव
लोणी देवकर, ता.१४ : हवामानातील अनिश्चिततेमुळे हवेत वाढलेल्या आद्रतेने इंदापूर तालुक्यातील केळी पिकावर करप्या रोगाचा प्रादुर्भाव वाढत आहे. शेतकरी कीड नियंत्रण करून पीक वाचविण्यासाठी उपाययोजना करीत आहेत. फवारणीचा आर्थिक खर्च भागवताना उजनी परिसरातील उत्पादक मेटाकुटीला आले आहेत.
केळीच्या झाडावर मायक्रोस्पेरीला म्युसीकोला बुरशीमुळे करप्या हा रोग येतो. हवामानातील बदलामुळे व सततचा लागून राहिलेल्या पावसामुळे या रोगाचा प्रादुर्भाव केळीवर झाला आहे. उजनीकाठच्या वरकुटे बुद्रुक, अगोती नं.२, कळाशी, गंगावळण, कालठण या भागातील प्रामुख्याने केळींमध्ये करप्याचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात वाढत आहे. केळी उत्पादक शेतकऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार मे महिन्यामध्ये झालेल्या अवकाळी पावसामुळे यावर्षी एक महिना अगोदरपासूनच करप्या केळी पिकावर जाणू लागला आहे. दरवर्षी शेतकरी करप्या रोगासाठी अगोदरपासूनच प्रतिबंधात्मक उपाययोजना राबवत असतात. परंतु हवामानाच्या अनिश्चिततेमुळे वातावरणातील वाढलेल्या आद्रतेमुळे करप्या हा सप्टेंबर- ऑक्टोबर ऐवजी जुलै महिन्यातच केळीवर आल्याने शेतकरी हवालदिल झाले.
करपा रोगाच्या प्रादुर्भावावर प्रतिबंधात्मक उपाय म्हणून कोणतीही उपाय योजना राबवली नसल्यामुळे सद्यस्थितीला शेतकरी हे फक्त बुरशीनाशक व कीटकनाशक फवारण्या, ठिपके असलेले पाने कापून टाकणे इत्यादी उपायांवर केळी पीक वाचवण्याचा प्रयत्न करत आहेत.
झाडांच्या फळधारणा कालावधीमध्ये बागेत करप्याचा शिरकाव झाल्यास झाडांना फळ धारणे वेळी अडचणी येतात. केळीच्या घडाचा आकार छोटा व फळांची संख्या देखील कमी होते. करप्यामुळे अनेक झाडांचे नुकसान होऊन त्याचा प्रत्यक्ष फटका अंतिम टप्प्यात असलेल्या केळी बागेतील विक्रीयोग्य मालावर होत आहे.
केळीवर असा होतो परिणाम
१. फळाचा आकार कमी होत असून संख्या घट
२. पानावर, फांद्यावर पिवळे, तपकिरी रंगाची ठिपके दिसतात
३. पाने सुकतात व गळायला लागतात.
४. फळांची प्रतवारी घसरून घडाचा आकार कमी होतो
५. झाडाची वाढ खुंटत उत्पादनात मोठी घट होते.
हाततोंडाला आलेला घास हिरावण्याची भीती
कमी बाजारभाव मिळून शेतकऱ्यांना आर्थिक भुर्दंड बसत आहे. निर्यातक्षम केळीवर देखील करप्याचा मोठा परिणाम झाली असून बुरशीनाशक फवारण्यासाठी अनपेक्षितपणे अधिकचा खर्च देखील वाढला आहे. हाततोंडाला आलेली केळी पीक करप्यामध्ये वाया जाते की काय, अशा भीतीने केळी उत्पादक धास्तावले आहे.
सर्वप्रथम करप्या हा जमिनीमध्ये येतो. जमिनीवरून खोडामार्गे झाडाच्या पानांवर करप्या रोगाचा प्रादुर्भाव वाढत जातो. बाह्य औषधांचा वापर करून करप्या रोग आटोक्यात आणण्यापेक्षा जमिनीचा पोत सुधारण्यावर शेतकऱ्यांनी लक्ष देणे आवश्यक आहे. जमिनीचा चांगला पोत आणि पाण्याचे सुयोग्य नियोजन केल्यास करप्या आटोक्यात येण्यास मदत मिळते.
- विजयसिंह बालगुडे, वसंतराव नाईक शेतीनिष्ट शेतकरी पुरस्कार प्राप्त शेतकरी
00194, 00195
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.