तीन दिग्गजांच्या प्रतिष्ठेची लढाई

तीन दिग्गजांच्या प्रतिष्ठेची लढाई

Published on

तीन दिग्गजांच्या प्रतिष्ठेची लढाई

इंदापूर पंचायत समितीच्या पंचवार्षिक निवडणुकीसाठी दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेस व भाजप, अशी तिरंगी लढत होण्याची शक्यता आहे. मात्र, सभापतिपद आरक्षित झाल्याने उपसभापतिसाठी मोठी रस्सीखेच पाहायला मिळणार आहे. मागील काही काळापासून तालुक्यातील राजकीय गणित बदलल्यामुळे आणि अनेक दिग्गज नेत्यांच्या प्रतिष्ठा पणाला लागल्यामुळे इंदापुरात पंचायत समितीसाठी कॉंटे की टक्कर पाहायला मिळणार आहे.

- संदीप बल्लाळ, लोणी देवकर

इंदापूर पंचायत समितीचे सभापतिपद अनुसूचित जातीसाठी राखीव आहे. त्यामुळे राजकीय गणितांमध्ये मोठे बदल झाले आहेत. सभापतिपदासाठी इच्छुक असणाऱ्या अनेक राजकीय पुढाऱ्‍यांच्या पदरी निराशा, तर काहींना आशेचा किरण दिसू लागला आहे. या वर्षी नवीन गट आणि गण रचनेनुसार इंदापूर पंचायत समितीतील गणसंख्येत वाढ झाली आहे. मागील पंचवार्षिक काळात असलेले १४ गण आता वाढून १६ झाले आहेत. त्यामुळे आगामी पंचायत समिती निवडणुकांमध्ये नवे चेहरे मैदानात उतरण्याची शक्यता आहे. वालचंदनगर, लासुर्णे व सणसर हे तीन गण अनुसूचित जातीसाठी आरक्षित झाल्याने सर्व राजकीय पक्षांचे या तीन गणांतील उमेदवार निवडून आणण्याकडे विशेष लक्ष दिले असणार आहे.
राष्ट्रवादी कॉंग्रेसचे नेते व कृषिमंत्री दत्तात्रेय भरणे, राष्ट्रवादी कॉंग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे नेते व माजी सहकार मंत्री हर्षवर्धन पाटील आणि नुकतेच शरद पवार यांच्या पक्षातून भाजपवासी झालेले जिल्हा परिषदेचे माजी सभापती प्रवीण माने यांच्यासाठी पंचायत समिती मिळवणे प्रतिष्ठेचा विषय झाला आहे. भरणे यांना मागील पंधरा वर्षांमध्ये पंचायत समितीवर स्वतः आमदार व मंत्री असताना सत्ता स्थापन करता आली नाही. याची साल त्यांच्या मनात कायम आहे. त्यामुळे यंदा पंचायत समितीवर राष्ट्रवादीचा झेंडा फडकवण्याचा निर्धार त्यांनी केला आहे. त्याच वेळी नुकत्याच झालेल्या विधानसभा निवडणुकीत पराभूत झालेले हर्षवर्धन पाटील यांनीही विधानसभेच्या पराभवाचे उट्टे पंचायत समितीच्या निवडणुकीत काढण्याचे धोरण अवलंबले आहे. प्रवीण माने हे तालुक्यात स्वतःचे असलेले वलय दाखवण्यासाठी पंचायत समितीमध्ये सभापतिपदापर्यंत पक्ष कार्यकर्त्यांना पोहोचवण्यासाठी विशेष प्रयत्न करताना दिसणार आहेत. एकूणच या तीन नेत्यांनी प्रतिष्ठेचे केलेल्या या निवडणुकीकडे जिल्ह्यासह संपूर्ण राज्याचे लक्ष लागलेलं आहे.
तालुक्यातील अनेक दुसऱ्या फळीतील नेते व गाव पुढाऱ्यांनी पक्षांतर केली आहेत. मागील निवडणुकीमध्ये एकमेकांच्या विरोधात असणारे आता एका पक्षात खांद्याला खांदा लावून काम करताना पाहायला मिळत आहे. अनेक जण अजूनही बघायच्या भूमिकेतून तटस्थ आहेत. या दुसऱ्या फळीतील कार्यकर्ते व गावकऱ्यांचा कल कोणत्या नेत्यांकडे असेल, यावरून सत्ता स्थापनेच्या गणितामध्ये मोठा फरक पडताना दिसून येणार आहे.
आरक्षणावरून मराठा आणि ओबीसी समाजामध्ये निर्माण झालेला काहीसा दुरावा इंदापूर पंचायत समितीतील निवडणुकीतील निर्णय मुद्दा ठरताना दिसू शकतो. प्रत्येक गट गणामध्ये पक्षीय राजकारणाबरोबरच जातीय राजकारणदेखील कळीचा मुद्दा ठरताना दिसणार आहे. त्यामुळे गट- गणातील उमेदवारी देताना जातीय समीकरणाचा समतोल राखणे, हे तिन्ही पक्षातील नेत्यांना क्रमप्राप्त ठरणार आहे.

मागील पक्षीय बलाबल
काँग्रेस- ८, राष्ट्रवादी काँग्रेस- ६.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com