तुटपुंजा मदतीवर संसाराचा गाडा चालवणे अशक्य

तुटपुंजा मदतीवर संसाराचा गाडा चालवणे अशक्य

Published on

संदीप बल्लाळ ः सकाळ वृत्तसेवा
लोणी देवकर, ता. ४ ः इंदापूर तालुक्यामध्ये मागील काही महिन्यामध्ये अतिवृष्टी व अवकाळी पावसामुळे शेत पिकांसह फळबागांचे देखील मोठे नुकसान झाले आहे. पिकांच्या झालेल्या नुकसानीमुळे शेतकऱ्यांवर मोठे आर्थिक संकट कोसळले आहे. शेतकऱ्यांचे लाखो रुपयांचे नुकसान झाले आहे, तर शासनाकडून मिळणारी मदत अतिशय तुटपुंजी आहे. या मदतीवर संसाराचा गाडा चालवणे असल्याने शेतकऱ्यांमध्ये नाराजीचा सूर उमटत आहे.
पावसामुळे शेतकऱ्यांचे मुख्य पिकांपैकी एक असलेल्या उसासह कांदा, टोमॅटो, मका, उडीद, सोयाबीन, कापूस, शेवगा, मिरची या शेतमालाचे मोठे नुकसान झाले. उभी पिके शेतात जागेवरती जळून गेली. याचबरोबर केळी, पेरू, डाळिंब, द्राक्ष, पपई, सीताफळ आदी फळबागांना देखील पावसाचा मोठा तडाखा बसला. या पावसामुळे फळबागांसह बागायती- जिरायती पिकांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले.
तालुक्यामध्ये प्रामुख्याने सणसर, भवानीनगर, कळस या भागामध्ये फळबागायतदारांचे मोठे नुकसान झाले असून, यामध्ये प्रामुख्याने द्राक्ष व डाळिंब बागांचा सहभाग आहे. तालुक्यातील एकूण फळबागांच्या ७० टक्के नुकसान होऊन अधिक फळबागांचे नुकसान हे सणसर, भवानीनगर या भागांमध्ये झाले आहे. तर दुसरीकडे उजनी काठची गावे व बावडा परिसरामध्ये कांदा, सोयाबीन, मका यासह उसाच्या मोठ्या नुकसानीला शेतकऱ्यांना सामोरे जावे लागले आहे.

अतिवृष्टीमुळे तोडणीसाठी आलेल्या डाळिंब पिकामध्ये पाणी गेल्याने लाखोचे नुकसान झाले. मात्र, महसूल व कृषी विभागाकडून पंचनामे देखील करण्यात आले नाहीत. त्यामुळे पिकावर केलेला खर्च तर वाया गेलाच, पण अनुदानापासून देखील वंचित राहिलो. तरी नुकसान झालेल्या फळबागांचे तरी पुन्हा पंचनामे करून शासनाकडून जाहीर झालेला निधी मिळावा ही मापक अपेक्षा आहे.
- सुनील बनकर, डाळिंब उत्पादक शेतकरी

पावसाने बाधित क्षेत्राचे तातडीने शासनाकडून पंचनामे करण्यात आले. मात्र, देण्यात आलेली आर्थिक मदत ही अत्यल्प व तुटपुंज्या स्वरूपाची आहे. शेतकरी पुन्हा उभा करायचा असेल, तर शासनाने बिनशर्त सरसकट कर्जमाफीसारखा निर्णय घेणे गरजेचे आहे.
- दादासाहेब जगताप, बाधित शेतकरी, वरकुटे बुद्रुक

कृषी व महसूल विभागाने अतिवृष्टीनंतर शासन आदेशानुसार तत्काळ पंचनामे करून अहवाल वरिष्ठांकडे सादर केला आहे. शासनाकडून उपलब्ध झालेला निधी सर्व बाधित शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा केला आहे.
- दीपक गरगडे, तालुका कृषी अधिकारी, इंदापूर

कृषी मंडल निहाय माहिती (सप्टेंबर २०२५)
मंडल जिराईत क्षेत्र हे. बागायत क्षेत्र हे. फळबाग क्षेत्र हे. एकूण
बावडा ०.३५ ५२२०.३५ १३९.७० ५३६०.४०
इंदापूर - ११२५.५७ २९९.४० १४२४.९७
भिगवण - ८७९.४७ ४०.१३ ९१९.६०
सणसर २०.६ ३१८८.५७ ७८०.९५ ३९८५.३२
टक्केवारी .०५ २४.५० २.९४ २७.५२

सप्टेंबर २०२५ मदत (३३ टक्क्यांपेक्षा जास्त नुकसान)
प्रकार बाधित शेतकरी संख्या बाधित क्षेत्र हे. मदत
जिराईत ३४ २०.९५ १७८०७५
बागायत २४५७४ १०४१५.५७ १७७०६४६९०
फळपिके २६९६ १२६०.१८ २८३५४०५०
एकूण २७३०४ ११६९६.७ २०५५९६८१५

65365

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com