इंदापूर तालुक्यात चाऱ्याचा प्रश्‍न गंभीर

इंदापूर तालुक्यात चाऱ्याचा प्रश्‍न गंभीर

Published on

लोणी देवकर, ता. ६ : इंदापूर तालुक्यात शेतीला पूरक मुख्य जोडधंदा म्हणून बहुतांश शेतकरी दूध उत्पादनाला पसंती देतात. खरीप हंगामात झालेल्या अतिवृष्टीमुळे तालुक्यातील फळबाग, नगदी पिकांसह चारा पिकांचे देखील मोठे नुकसान झाले आहे. यामुळे गोपालक शेतकऱ्यांना जनावरांच्या चाऱ्याची कमतरता जाणू लागली आहे. चाऱ्याचा प्रश्न दिवसेंदिवस गंभीर होत असल्याने दूध उत्पादनात घट होण्याची भीती व्यक्त केली जात आहे.
तालुक्यात अतिवृष्टीमुळे चारा पिकांचे खूप मोठे नुकसान झाले आहे. यामध्ये प्रामुख्याने जनावरांचा चारा म्हणून वापरले जाणारे मका आणि कडवळ या पिकांचे देखील मोठे नुकसान झाले आहे. ७ हजार ३०० हून अधिक हेक्टर वरील चारा ऑगस्ट- सप्टेंबर महिन्यात झालेल्या पावसात मातीमोल झाला. दूध उत्पादकांची खूप मोठी मदार चारा उत्पादक शेतकऱ्यांवर अवलंबून असते, परंतु जोरदार झालेल्या पावसात वाया गेलेल्या चाऱ्यामुळे पशुपालक शेतकऱ्यांपुढे चाऱ्याचा प्रश्न आ वासून उभा ठाकला आहे.

खरीप हंगामातील चारा पीक वाया गेले असतानाच ऑक्टोबर- नोव्हेंबर महिन्यात साखर कारखान्यांचा हंगाम सुरू होत असल्याने दर कमी होतो. यामुळे चारा उत्पादक या कालावधीत चाऱ्याच्या लागवडी जास्त करत नाहीत. दुभत्या जनावरांना डिग्री व फॅट सह अधिकचे दूध मिळवण्यासाठी मका व कडवळ ही दोन चारा पिके महत्त्वाची ठरतात. कडवळ आणि मका कणसांसह दुभत्या जनावरांना चाऱ्यामध्ये खायला घातल्यास जनावरांपासून मिळणारे दूध वाढवण्यास मदत होते. चारा पिके उपलब्ध न झाल्यास उत्पादनात घट होण्याची शक्यता आहे. परंतु आता ही दोन्ही महत्त्वाची चारापिके वाया गेल्याने जनावरांच्या डिग्री आणि फॅटसाठी पशुपालकांना अधिकचे पैसे मोजून पशुखाद्य घ्यावे लागत आहे. ज्यामुळे अगोदरच कमी दर मिळत असताना हा वाढलेला खर्च पशुपालकांचा आर्थिक हिशोब बिघडवताना दिसत आहेत.

ऊस कारखाने सुरू झाल्यामुळे भेडसावणारा चाऱ्याचा प्रश्न काही प्रमाणात कमी होणार आहे. पण जनावरांना दूध वाढीसाठी आणि नियमित डिग्री व फॅटसाठी आवश्यक असणारा पौष्टिक घटक देणारा चारा हा पावसाळ्यातच वाया गेल्याने अधिकचे पशुखाद्य विकत घ्यावी लागत असल्यामुळे खर्च वाढला आहे. दुधाचा व्यवसाय गेले अनेक वर्षापासून करत असल्यामुळे खर्च वाढला तरी तो बंद करता येत नाही. प्रपंचासह सर्व आर्थिक घडामोडीच दूध व्यवसायांवर असल्यामुळे वाढलेला खर्च सहन करत हा व्यवसाय करावा लागत आहे.
- संजय जाधव, गोपालक व दूध उत्पादक शेतकरी, वरकुटे बुद्रुक

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com