नगरपालिका निवडणुकीसाठी इच्छुकांची वर्दळ
राजकीय पक्षांची दुहेरी कसरत
पर्यटननगरी लोणावळ्याचे नगराध्यक्षपद अनुसूचित जाती प्रवर्गासाठी (एससी) राखीव झाल्याने इच्छुकांच्या आकाक्षांवर अगोदरच पाणी फिरले आहे. त्यात स्थानिक राजकारणातील फाटाफूट, शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या फुटीनंतर राजकीय समीकरणांसह अनेकांची राजकीय गणिते बदलणार आहेत. कार्यकर्त्यांच्या महत्वकांक्षा वाढल्यामुळे सर्वच राजकीय पक्षांना एकीकडे कार्यकर्त्यांची मर्जी सांभाळण्याबरोबरच मतदारांनाही खूष करण्यासाठी दुहेरी कसरत करावी लागणार आहे.
- भाऊ म्हाळसकर
लो णावळा नगरपालिकेच्या आगामी निवडणुकांमध्ये सर्वच राजकीय पक्षांमध्ये इच्छुकांची वर्दळ वाढली असून राजकीय घडामोडींनी वेग आला आहे. दीर्घ कालावधीनंतर स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका होणार आहे. त्यामुळे दुसऱ्या फळीतील नेतृत्व तयार झाले आहे.
लोणावळा नगरपरिषदेचे नगराध्यक्षपद अनुसूचित जातीसाठी (एससी) राखीव झाले आहे. त्याने नगराध्यक्षपदासाठी सर्वसाधारण तसेच इतर मागास प्रवर्गातून तयारी करत असलेल्या उमेदवारांचा हिरमोड झाला आहे. मात्र, दुसरीकडे आरक्षण जाहीर झाल्यानंतर एससी संवर्गातून जे नगरसेवक पदासाठी ही इच्छुक नव्हते. त्यांनी आता नगराध्यक्षपदासाठी उमेदवारीसाठी मागणी करत तयारी सुरू केली आहे. नगराध्यक्षपदासह विजयाची खात्री असणारे तगडे उमेदवार निवडताना सर्वच राजकीय पक्षांची तारांबळ उडणार आहे. नगराध्यक्षपदासाठी सर्वच पक्षांमधून दावेदारी सांगितली जात आहे. माजी नगरसेवक-नगरसेविकांसह नवोदित चेहऱ्यांनी इच्छुक म्हणून सोशल मीडियाच्या माध्यमातून आपली दावेदारी सांगितली आहे.
आमदार शेळके यांचा प्रभाव
विधानसभा निवडणुकीनंतर आमदार सुनील शेळके यांचा प्रभाव वाढल्याने सध्या राष्ट्रवादी काँग्रेसकडे इच्छुकांची मांदियाळी आहे. प्रत्येकाने आपापल्या परीने मोर्चेबांधणी सुरू केली आहे. भाजप, काँग्रेसमधून बाहेर पडून काही नगरसेवकांसह सर्वच राजकीय पक्षांचे अनेक पदाधिकारी शेळके यांच्या गोटात येऊ लागले आहेत. खुद्द राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये उमेदवारीसाठी चढाओढ लागली आहे. त्यामुळे शेळके यांची डोकेदुखी वाढली असून उमेदवारी ठरविणे अवघड जात आहे. कोणी नाराज होऊ नये, यासाठीही प्रयत्न केले जात आहेत.
निवडणुकीत एकत्रित आघाडी
लोणावळ्यात महायुती किंवा महाआघाडी अशी लढत सध्यातरी दृष्टिक्षेपात नाही. गेल्यावेळेस नगरपालिकेत भाजपचे नगराध्यक्षपदासह १०, काँग्रेसचे ६, राष्ट्रवादीचे ०, शिवसेनेचे ६, अपक्ष ४, आरपीआय १ असे बलाबल होते. भाजपचे प्रमुख सत्ताकेंद्र असलेल्या माजी नगराध्यक्षा सुरेखा जाधव, श्रीधर पुजारी यांच्या विरोधकांची मोट बांधत त्यांची कोंडी करण्यात आमदार शेळके यांना काहीसे यश मिळाले आहे. त्यांना भाजप विरोधात आघाडीचा पर्याय खुला आहे.
नागरिकांचे प्रश्न केंद्रस्थानी
पर्यटननगरी म्हणून ओळख असलेल्या लोणावळ्यात शाश्वत विकासावर भर देण्याची मागणी नागरिकांकडून होत आहे. पर्यटन नियोजन, प्रस्तावित विकास प्रकल्पांना चालना, वाहतूक व्यवस्थापन, पाणीपुरवठा, घनकचरा निर्मूलन हे प्रमुख मुद्दे ठरण्याची शक्यता आहे.
अर्थकारणावर भर
लोणावळ्यातील निवडणुका पक्षपातळीवर लढविल्या जात नाहीत. निवडणुकांमध्ये पूर्वापार अर्थकारण चालत आल्यामुळे लोणावळ्यातील मतदारही आता मतदानासाठी सहसा तसे बाहेर पडत नाही. त्यामुळे उमेदवाराला खर्च करताना आपल्या हक्कांच्या मतांबरोबर अपेक्षित मते मिळविण्यासाठी खर्च करताना एक सदस्यीय पद्धतच सोयीची वाटते. बहुसदस्य पद्धतीमुळे प्रभागातील मतदारांचा आकडा वाढणार असल्याने इच्छुकांच्या खिशाला चांगलीच झळ बसणार आहे. त्याने अनेक इच्छुकांचे धाबे दणाणले आहेत. बहुसदस्यीय प्रभाग पद्धतीमुळे अमर्याद अर्थकारणाला खीळ बसण्याची शक्यता असली तरी निवडणुकीत पैशाचा खेळ होणार हे
नक्की.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

