द्रुतगतीवरील ‘महाकोंडी’ प्रशासनासाठी धोक्याची घंटा

द्रुतगतीवरील ‘महाकोंडी’ प्रशासनासाठी धोक्याची घंटा

Published on

लोणावळा, ता. ५ : मुंबई-पुणे द्रुतगती मार्गावर आडोशी बोगद्याजवळ टँकर अपघातात झालेली वायू गळती आणि त्यानंतर परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी झालेली दिरंगाई, पर्यायाने झालेली वाहतूक कोंडी यामुळे प्रशासनाच्या अनेक मर्यादा उघड झाल्या आहेत.
महामार्गावर झालेली ३३ तासांची कोंडी ही केवळ एक तांत्रिक अडचण नसून, ती एक गंभीर धोक्याची घंटा मानली जात आहे. गॅस टँकरसारखी स्फोटक वाहने जेव्हा प्रमुख मार्गावर उलटतात, तेव्हा प्रशासन आणि नागरिक या दोघांच्याही आपत्ती व्यवस्थापनाची कसोटी लागते. अशा परिस्थितीत संयम आणि पूर्वतयारीच आपल्याला वाचवू शकते, यासाठी नियोजन करणे महत्त्वाचे ठरणार आहे, असे नागरिक सांगत आहेत.

तातडीने ‘एक्झिट पॉइंट्स’
घाटात किंवा महत्त्वाच्या ठिकाणी असे ‘पॉइंट्स’ असावेत जिथून वाहने वळवून माघारी किंवा पर्यायी रस्त्यावर पाठवता येतील. कोंडी नेमकी कुठे आणि किती मोठी आहे, हे पाहण्यासाठी ड्रोनचा वापर करून अडकलेल्या लोकांपर्यंत (विशेषतः रुग्ण, महिला, लहान मुले, वृद्ध) मदत पोहोचवणे सोपे होईल. वाहनचालकांनी लांबच्या प्रवासाला निघताना गाडीत पुरेसे इंधन, पिण्याचे पाणी आणि सुका मेवा नेहमी सोबत ठेवावा.

​धोकादायक मालवाहतुकीसाठी स्वतंत्र नियम
गॅस, रसायने किंवा स्फोटक पदार्थ नेणाऱ्या अवजड वाहनांसाठी प्रवासाची वेळ निश्चित असावी. त्यांच्यासाठी विशेष ‘एस्कॉर्ट’ अर्थात संरक्षक ताफ्याची सुविधा असावी. वाहनचालक प्रशिक्षित असावा. अपघाताप्रसंगी टँकरमध्ये असलेले अग्निशमन यंत्र वापरण्याचे प्रशिक्षण चालकाकडे असणे आवश्यक ठरते. वाहतूक पोलिस कर्मचाऱ्यांनाही याबाबत पुरेसे ज्ञान अवगत करून देण्याची आवश्यकता आहे.

वाहनचालकांची शिस्त
अपघात झाल्यावर अनेकजण घाईघाईत चुकीच्या बाजूने किंवा आपत्कालीन लेनमध्ये आपले वाहन नेतात. यामुळे रुग्णवाहिका किंवा क्रेनला घटनास्थळी पोहोचता येत नाही. मार्गिकेची (लेनची) शिस्त पाळणे महत्त्वाचे आहे. समाजमाध्यमांवरील माहितीपेक्षा अधिकृत यंत्रणा, महामार्ग पोलिस किंवा खात्रीशीर माहितीवर विश्वास ठेवण्याची गरज आहे. अशा अपघातांमध्ये वेळेस अत्यंत महत्त्व असते. ‘गोल्डन अवर’मध्ये वेळीच उपाययोजना केली, तर तीव्रता कमी होऊ शकते. तरच वाहने आणि नागरिकांची कोंडी रोखता येईल.

चालकाची जबाबदारी महत्त्वाची
कधीकधी वाहन चालकाच्या हलगर्जीपणामुळे (मद्यपान, अतिवेग, किंवा झोप पूर्ण न होणे) अपघात होतो. द्रुतगती मार्गावर गॅस टँकरसारख्या धोकादायक वाहनाचा अपघात झाल्यास केवळ वाहतूकच विस्कळित होत नाही; तर हजारो लोकांचा जीव धोक्यात येतो. अशा परिस्थितीत टँकर चालकाची जबाबदारी महत्त्वाची आहे.

नागरिकांची अपेक्षा
- महामार्गावर एखादी आणीबाणीची घटना, अपघात घडल्यास वाहनचालक, नागरिकांना तातडीची माहिती व्हावी.
- द्रुतगती मार्ग, राष्ट्रीय महामार्गाच्या प्रवेशद्वारांवर (टोल नाक्यांवर) डिजिटल बोर्डद्वारे त्वरित सूचना मिळायला हवी
- वाहनचालक पर्यायी मार्गांचा विचार करू शकतील, अशी व्यवस्था हवी
- प्रभावी संदेशवहन यंत्रणा असणे गरजेचे आहे.
- काही वेळा पोलिसांनी स्थानिक स्थिती लक्षात घेऊन तातडीने निर्णय घेणे आवश्यक
- आणीबाणीच्या काळात काय खबरदारी घ्यावी, कशी उपाययोजना करावी यावर मार्गदर्शन गरजेचे
- आपत्कालीन स्थितीत स्थानिक प्रशासनाची भूमिका महत्त्वाची


PNE26V92858

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com