कर्जासाठी विमा लादू नये : भोर | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

कर्जासाठी विमा लादू नये : भोर
कर्जासाठी विमा लादू नये : भोर

कर्जासाठी विमा लादू नये : भोर

sakal_logo
By

मंचर, ता. १ : ‘‘राष्ट्रीयकृत बँका व जिल्हा बँकेत अनेक वेळा बचत ठेव, मुदत ठेव कर्ज मागणीसाठी ग्राहकांना विमा पॉलिसी घेण्यासाठी दबाव टाकला जात असल्याच्या तक्रारी प्राप्त होत आहेत. काही वेळा परस्पर अर्जावर सही घेऊन ग्राहकांना माहीत न होताच विमा पॉलिसी लादली जात आहे. बँकांनी आपला व्यवसाय करावा पण त्याबरोबर ग्राहकाचे बँक खाते आपल्या बँकेत आहे म्हणून त्यास विमा काढण्याची सक्ती करू नये. अन्यथाग्राहक पंचायतीला आंदोलन उभे करावे लागेल.’’ असा इशारा ग्राहक पंचायतीचे पुणे जिल्हा उपाध्यक्ष अशोक भोर यांनी दिला.
मंचर (ता. आंबेगाव) येथील रयत शिक्षण संस्थेच्या अण्णासाहेब आवटे महाविद्यालयात झालेल्या राष्ट्रीय ग्राहक दिनानिमित्त सुरू असलेल्या ग्राहक सप्ताह कार्यक्रमात भोर बोलत होते. या वेळी अण्णासाहेब आवटे महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. के. जी कानडे, महिला जिल्हा संघटक वैशाली आडसरे, ॲड. शिल्पा आडसरे, आंबेगाव तालुका ग्राहक पंचायतीचे अध्यक्ष सुभाष मावकर, संघटक देविदास काळे, अतुल इंदोरे, रामदास थोरात, सरपंच डी. आर. सुपे, संजय चिंचपुरे, दत्तात्रेय खानदेशे, डॉ. व्ही. बी निकम उपस्थित होते.
शिल्पा आडसरे म्हणाल्या ‘‘ग्राहकांवर अन्याय होत असल्यास ग्राहक आयोग पुणे येथे पाच लाख रुपयांपर्यंतचे दावे दाखल करण्यासाठी कोणतेही शुल्क आकारले जात नाही. तसेच दावा दाखल करण्यासाठी व चालविण्यासाठी वकील देण्याची आवश्यकता नाही. आपण स्वतःच युक्तिवाद करू शकतो.’’
डॉ. कानडे म्हणाले ‘‘ग्राहक प्रबोधनाचे कार्यक्रम वेळोवेळी होणे गरजेचे आहे. त्यामुळे विद्यार्थी दशेतच त्यांना ग्राहकांचे हक्क व कर्तव्याची जाणीव होईल.’’ प्रबोधन समिती प्रमुख ज्ञानेश्वर उंडे यांनी या वेळी मार्गदर्शन केले.