
श्रमदानातून दोन ट्रॉली कचऱ्याचे संकलन
मंचर, ता.१९ :“स्वच्छ सर्वेक्षण २०२३ व माझी वसुंधरा अभियान ३.० अंतर्गत मंचर (ता.आंबेगाव) नगरपंचायतीच्या कार्यक्षेत्रात पुण्याचे जिल्हाधिकारी डॉ.राजेश देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली मंगळवारी (ता.१७) सकाळी आयोजित केलेल्या श्रमदान शिबिरात नगरपंचायतीचे अधिकारी, कर्मचारी व परिसरातील नागरिकांनी उत्स्फूर्तपणे भाग घेतला. यावेळी तब्बल दोन ट्रॉली कचरा संकलित करण्यात आला, अशी माहिती मंचर नगरपंचायतीचे मुख्याधिकारी गोविंद जाधव यांनी दिली.
महात्मा गांधी विद्यालयाचा परिसर सकाळी सात ते आठ या वेळेत स्वच्छ करण्यात आला. हातात खराटे, घमेली घेऊन अधिकारी, कर्मचारी व नागरिक स्वच्छता मोहीम राबवीत होते. जाधव म्हणाले “स्वच्छ सर्वेक्षण २०२३ मध्ये मंचर शहरामध्ये घनकचरा व्यवस्थापन, सांडपाणी व्यवस्थापन, हागणदारीमुक्त शहर, कचऱ्यावर प्रक्रिया, घरोघरी जाऊन कचरा संकलन करणे व अनेक नावीन्यपूर्ण उपक्रम राबवत आहे. मंचर शहरात सिंगल युज प्लास्टिकवर कारवाई करून त्याला अटकाव घातला आहे.
दर मंगळवार व शुक्रवारी मंचर शहरात स्वच्छता मोहीम राबविली जाणार आहे. श्रमदान मोहिमेमध्ये सामाजिक संस्था, ज्येष्ठ नागरिक, महिला बचत गट, व्यापारी, शिक्षण,वैद्यकीय क्षेत्रातील मान्यवर, युवक-युवती यांनी सहभागी होऊन या सामाजिक उपक्रमाला हातभार लावावा.
- गोविंद जाधव, मुख्याधिकारी मंचर नगरपंचायत.
.............
07298