आंबेगावात उपाययोजना न केल्यास आंदोलन | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

आंबेगावात उपाययोजना न केल्यास आंदोलन
आंबेगावात उपाययोजना न केल्यास आंदोलन

आंबेगावात उपाययोजना न केल्यास आंदोलन

sakal_logo
By

मंचर, ता. १८ : “आंबेगाव तालुक्यात बिबट्याच्या उपद्रवाने शेतकरी त्रस्त झाले आहेत. कोंबड्या, शेळ्या, पशुधन व मानवावरही बिबट्याचे हल्ले वाढले आहेत. नागरिक भयभीत झाले आहेत. वनखात्याचे अधिकारी व कर्मचारी तातडीच्या उपाययोजना करण्याऐवजी उडवाउडवीची उत्तरे देतात. पिंजरा लावण्यास टाळाटाळ करतात. याबाबत बिबट्यांना जेरबंद करण्यासाठी तातडीने आवश्यक त्या उपाययोजना हाती न घेतल्यास उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेचे कार्यकर्ते रस्त्यावर उतरून आंदोलन करतील,” असा इशारा पक्षाचे जिल्हाप्रमुख सुरेश भोर यांनी दिला.
ते म्हणाले, “अवसरी खुर्द, गोवर्धन डेअरीच्या मागील बाजूला भरत भोर, रामदास शिंदे, रोहन भोर या शेतकऱ्यांनी अनेकदा बिबट्या पाहिला. याबाबत मंचर वनपरिक्षेत्र कार्यालयातील अधिकाऱ्यांबरोबर चर्चा केली. पण पिंजरा लावला नाही. त्यानंतर रोहन भोर यांच्या चारचाकीसमोरून बिबट्या जात असल्याचा व्हिडिओ पाठविला. पण वन खात्यातील अधिकाऱ्यांचा प्रतिसाद मिळाला नाही. मंचर-मुळेवाडी (ता. आंबेगाव) येथे पिंजरा आहे. ट्रॅक्टरमध्ये घेऊन या, असा निरोप वनकर्मचाऱ्यांनी रोहन भोर यांना दिला. त्यानुसार पिंजरा आणला. त्यानंतर शेतकऱ्यांनीच बिबट्याला आमिष म्हणून पिंजऱ्यात शेळी ठेवावी, असेही सांगण्यात आले. हे काम वन खात्याचे आहे, असे शेतकऱ्यांनी निदर्शनास आणून दिले. बुधवारी (ता. १८) पहाटे शेतकरी रामदास शिंदे यांच्या २५ कोंबड्या बिबट्याने फस्त केल्या. जर याआधीच पिंजऱ्यात शेळी ठेवली असती तर बिबट्या जेरबंद झाला असता. शेतकऱ्याचे नुकसान वाचले असते. याभागात बिबट्याने अनेक कुत्री फस्त केली आहेत.”
“आंबेगाव तालुक्यात पशुधनाचे होणारे नुकसान वाचविण्यासाठी व बिबट्यांचा उपद्रव थांबविण्याच्या मागणीच्या पाठपुराव्यासाठी सोमवार (ता. ३०) रोजी सकाळी ११ वाजता अवसरी पेठ घाटातील मंचर वनपरिक्षेत्र कार्यालयासमोर शिवसेनेच्या वतीने मोर्चा काढून आंदोलन केले जाईल,” असे भोर यांनी सांगितले.


“अवसरी खुर्द (ता. आंबेगाव) येथील गोवर्धन दूध प्रकल्पाच्या मागील बाजूस लावलेल्या पिंजऱ्यात बुधवारी (ता. १८) रात्री भक्ष म्हणून शेळी किंवा मेंढी ठेवण्याचे नियोजन केले आहे. याभागात जनजागृतीसाठी वनकर्मचाऱ्यांची रात्रीची गस्त सुरु आहे. बिबट्याला जेरबंद करण्यासाठी प्रयत्न सुरु आहेत.”
-प्रदीप रौधळ, वनपरिक्षेत्र अधिकारी, मंचर (ता. आंबेगाव)