
वडगाव काशिंबेग येथे मृत बछडा आढळला
मंचर, ता. २० : श्री क्षेत्र वडगाव काशिंबेग (ता. आंबेगाव) येथे नर जातीचा बिबट बछडा मृतदेह अवस्थेत आढळून आला. तीन महिन्याच्या बछड्याला मोठ्या बिबट्याने चावा घेतल्याने त्याच्या मृत्यू झाल्याचा प्राथमिक अंदाज वनखात्यातील अधिकाऱ्यांनी व्यक्त केला.
श्री क्षेत्र वडगाव काशिंबेग येथील मानकर वस्तीतील शेतकरी भरत मानकर हे गवत कापत होते. त्यांना तेथे बिबट्याच्या गुरगुरण्याचा आवाज आला. बिबट्या बछड्याला तोंडात धरून त्याच्या मानेला चावा घेऊन हिसके देत होता. मानकर यांनी ताबडतोब वस्तीवर जाऊन ग्रामस्थांना सांगितले. त्यावेळी वस्तीवरील नागरिक घटनास्थळी आले. बिबट्या निघून गेला होता. दत्ताराम मानकर यांच्या शेतात मृत नर बछडा पडलेला होता.
याबाबत नागरिकांनी मंचर वनपरिक्षेत्र कार्यालयाचे वनपाल संभाजीराव गायकवाड यांना कळविली. गायकवाड व वनकर्मचाऱ्यांनी घटनास्थळी भेट देऊन पंचनामा केला. बछड्याचे शवविच्छेदन करण्यात आले. त्यानंतर पेठ-अवसरी खुर्द (ता. आंबेगाव) येथील वन उद्यान परिसरात जुन्नरचे सहाय्यक वनसंरक्षक संदेश पाटील, वनपरिक्षेत्र अधिकारी प्रदीप रौंदळ यांच्या उपस्थितीत बछड्याचा अंत्यविधी केला.
दरम्यान, बछड्याच्या मृत्यूमुळे बिबट मादी संतप्त होण्याची दाट शक्यता आहे. या भागातील नागरिकांनी सतर्क राहावे, असे आवाहन वनखात्याने केले आहे.