
नाशिक महामार्गावर दुर्घटना टळली मालवाहू ट्रकचा पाटा तुटल्याने निखळले चाक; काही काळ वाहतूक कोंडी
मंचर, ता. २२ : पुणे-नाशिक राष्ट्रीय महामार्गावर मंचर (ता. आंबेगाव) एसटी बसस्थानकासमोर रविवारी (ता. २२) मालवाहू ट्रकचा पाटा तुटल्याने चालकाच्या बाजूचे चाक निखळले. त्यामुळे ट्रक फरपटत दहा ते बारा फूट गेला. त्यावेळी रस्त्यावरून अनेक वाहने ये-जा करत होती. पण मोठी दुर्घटना टळली. या घटनेमुळे वाहतूक कोंडी झाली होती.
मंचर येथे रविवारी आठवडे बाजार भरतो. त्यामुळे बसस्थानकासमोर नागरिक, रिक्षाचालक व रस्त्यावर ये-जा करणाऱ्या वाहनांची वर्दळ लक्षणीय होती. तसेच खेड ते सिन्नर राष्ट्रीय महामार्ग मंचर बाह्यवळण रस्ता कामामुळे बंद केला आहे. त्यामुळे मंचर शहरातून ये-जा करणाऱ्या वाहनांच्या संख्येत भर पडली आहे. दुपारी साडेबाराच्या सुमारास मंचरहून पुण्याच्या दिशेला जाणारा ट्रकचे चाक निखळल्यामुळे अन्य ये-जा करणारे वाहनचालक गोंधळून गेले. त्याचवेळी बसस्थानकातून एक एसटी बाहेर पडत होती. एसटीच्या चालकाने प्रसंगावधान राखून गाडी थांबवली. तसेच पुण्याहून येणाऱ्या तीन ते चार कारही जागेवरच थांबल्या. त्यामुळे मोठी दुर्घटना टळली. या प्रकारामुळे येथे वाहन कोंडी झाली होती. तसेच बघ्यांची गर्दीही झाली होती. या घटनेची माहिती समजताच मंचर पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक सतीश होडगर, वाहतूक विभागाचे गणेश येळवंडे, सोमजित गवारी, संपत काळभोर, गणेश मांदळे घटनास्थळी आले. त्यांनी वाहतूक कोंडी दूर करण्यासाठी शर्थीचे प्रयत्न केले. प्रथम मालट्रकमधील साहित्य अन्य ट्रकमध्ये हलविले. त्यानंतर क्रेनच्या साहाय्याने मालट्रक हलविण्यात आला. दीड तासानंतर वाहतूक कोंडी कमी होण्यास मदत झाली.
प्रजासत्ताक दिनाच्या दिवशी होणारी रस्त्यावरील वाहनांची गर्दी लक्षात घेऊन खेड ते सिन्नर महामार्ग मंचर बाह्यवळण रस्ता दोन्ही बाजूंनी वाहतुकीसाठी खुला करावा, अशी मागणी भागडी गावचे सरपंच तबाजी उंडे यांनी केली आहे.