कृषिपंपांना दिवसा विजेबाबत कार्यवाही करू | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

कृषिपंपांना दिवसा विजेबाबत कार्यवाही करू
कृषिपंपांना दिवसा विजेबाबत कार्यवाही करू

कृषिपंपांना दिवसा विजेबाबत कार्यवाही करू

sakal_logo
By

मंचर, ता. २१ : ‘‘आंबेगाव- जुन्नर विभागाचे प्रांत अधिकारी सारंग कोडलकर व जिल्हाधिकारी राजेश देशमुख यांच्यासमवेत लवकर शेतकऱ्यांची बैठक घेतली जाईल. कृषी पंपांना दिवसा वीजपुरवठा करण्याबाबत व बिबट्यांचा बंदोबस्त करण्यासाठी ठोस उपाययोजना हाती घेण्यासाठी आवश्यक ती कार्यवाही करू,’’ असे आश्वासन आंबेगाव तालुक्याच्या तहसीलदार रमा जोशी यांनी दिले.
मंचर (ता. आंबेगाव) येथे बिबट्यांचे पाळीव प्राणी व नागरिकांवर वाढते हल्ले रोखावेत. कृषी पंपांना दिवसा वीजपुरवठा मिळावा. या मागणीसाठी मंगळवारी (ता.२१) प्रांत कार्यालयासमोर स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे आंबेगाव तालुक्याचे अध्यक्ष प्रभाकर बांगर यांच्या नेतृत्वाखाली आक्रोश आंदोलन करण्यात आले.
यावेळी पंचायत समितीचे माजी सदस्य बाळासाहेब वाघ, आंबेगाव तालुका किसान कॉंग्रेसचे अध्यक्ष अँड.राजू बेंडे पाटील, बाळासाहेब इंदोरे, काशिनाथ दौंडकर, प्रकाश कोळेकर, संतोष पवार, मंगेश बांगर, श्रीकांत पोखरकर, स्वप्नील बांगर, बाबाजी पोखरकर, सुदाम पोखरकर, गुलाब कुरकुटे यांच्यासह शेतकरी व नागरिक मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. मंचर कृषी उत्पन्न बाजार समिती, मुख्य बाजारपेठेमार्गे मोर्चा प्रांत कार्यालयावर नेण्यात आला. यावेळी प्रशासन, महावितरण कंपनी व वनखात्याच्या विरोधात बिबट्याचे मुखवटे तोंडावर घालून घोषणाबाजी करण्यात आली.
आंबेगाव, जुन्नर व शिरूर तालुक्यात दररोज बिबट्यांचे हल्ले होतात. त्यामुळे जनतेत भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. रात्री शेतीला पाणी देता येत नाही. त्यामुळे शेती उत्पादनावर परिणाम झाला आहे. महावितरण कंपनीने बघ्याची भूमिका न घेता कृषी पंपांना रात्रीऐवजी दिवसा वीज पुरवठा करावा. वनखात्याने सर्व बिबटे जेरबंद करून सुरक्षित ठिकाणी हलवावेत. याबाबत तातडीने कार्यवाही न झाल्यास आंदोलन तीव्र करू. वेळप्रसंगी कायदा हातात घेऊ, असा इशारा प्रभाकर बांगर यांनी दिला.
वनाजी बांगर, प्रदीप चिखले, नवनाथ पोखरकर, अभिलाष घेवारी, मारुती गोरडे, वाघ, बेंडे पाटील यांची भाषणे झाली. तहसीलदार रमा जोशी, मंचरच्या वनपरिक्षेत्र अधिकारी स्मिता राजहंस व मंचर महावितरण कंपनीचे प्रभारी कार्यकारी अभियंता सुधीर पनीर यांना मागण्यांचे निवेदन दिले.