
सफाई कामगारांना घरांसाठी पर्यायी जागा देण्याची मागणी
मंचर, ता. ५ : “मंचर नगरपंचायतीच्या वतीने भाजी बाजार तळाजवळ नगरपंचायतीचे १५ सफाई कर्मचारी पत्र्याच्या शेडमध्ये राहतात. त्या जागेवर बगीचा बांधकाम प्रस्तावित आहे. बेघर होण्याच्या मार्गावर असलेल्या कुटुंबांना निवाऱ्यासाठी पर्यायी जागा द्यावी,” अशी मागणी मंचर पाणी पुरवठा योजनेचे अध्यक्ष वसंतराव बाणखेले यांनी केली आहे.
बाणखेले म्हणाले, “तत्कालीन ग्रामपंचायतीने सफाई कर्मचाऱ्यांसाठी पत्राचे शेड बांधण्यासाठी जागा उपलब्ध करून दिली होती. रोज कचरा उचलणे, गटार साफ करणे, गळती असलेल्या पाइपलाइन दुरुस्ती व खोदकाम करणे, ट्रॉलीत कचरा भरून विल्हेवाट लावणे आदी कामे तुटपुंज्या पगारावर कर्मचारी गेली अनेक वर्ष करतात. बगीचा झाला पाहिजे पण पर्यायी व्यवस्था करून कर्मचाऱ्यांना घरासाठी जागा उपलब्ध करून देण्यासाठी नगरपंचायतीने पुढाकार घ्यावा.”
दरम्यान, या मागणीच्या पाठपुराव्यासाठी माजी सरपंच दत्ता गांजाळे व वसंतराव बाणखेले यांच्या नेतृत्वाखाली मंचर नगरपंचायतीचे मुख्यधिकारी गोविंद जाधव यांना शिष्टमंडळ भेटले. सफाई कामगारांच्या कामाची दखल घेऊन त्यांना न्याय दिला जाईल, असे जाधव यांनी सांगितले.