
बिबट्यांच्या उपाययोजनांसाठी पत्रकारांची भूमिका महत्त्वाची
मंचर, ता. २३ : ‘‘जुन्नर वनविभागात सध्या असलेली बिबट्यांची संख्या देशात सर्वाधिक आहे. प्रामुख्याने मंचर वनविभागात व शिरूर तालुक्याच्या पश्चिम भागात बिबट्यांची संख्या वाढलेली आहे. भविष्यात मानव व बिबट संघर्ष तीव्र होणार आहे. हा संघर्ष टाळण्यासाठी, बिबट्यापासून बचाव व उपाय योजनांबाबत जनजागृती करण्यासाठी पत्रकारांची भूमिका महत्त्वपूर्ण ठरणार आहे,’’ असे जुन्नर वनविभागाचे उपसंरक्षक अमोल सातपुते यांनी सांगितले.
अवसरी (ता. आंबेगाव) येथील वन उद्यानात जुन्नर वनविभागाच्या वतीने आंबेगाव व खेड तालुक्यातील पत्रकारांसाठी आयोजित केलेल्या कार्यशाळेत सातपुते बोलत होते. यावेळी पुणे वन विभागाचे मुख्य वनसंरक्षक एन. आर. प्रवीण, सहायक वनसंरक्षक संदेश पाटील, मंचर वनपरिक्षेत्र अधिकारी स्मिता राजहंस, घोडेगाव वनपरिक्षेत्र अधिकारी महेश गारगोटे, खेड वनपरिक्षेत्र अधिकारी प्रदीप रौंधळ, वन विभागाचे कर्मचारी व पत्रकार उपस्थित होते.
सातपुते म्हणाले, ‘‘सध्या दररोज बिबट्यांचे दर्शन होत असून, हल्ल्याच्या घटना घडत आहेत. वनखात्यामार्फत ताबडतोब घटनास्थळी भेट देऊन पंचनामे करून दिलासा दिला जातो. जनजागृती केली जाते. या भागातील पत्रकार सतत वनखाते व शेतकरी यांची बाजू समजून घेऊन व तारतम्य ठेऊन बातम्या देतात. ही बाब कौतुकास्पद आहे. वेळोवेळी वनखात्यातील कर्मचारी व अधिकाऱ्यांशी संपर्क ठेवतात. सूचना करतात. त्यांनी केलेल्या सूचनांची दखल वनखात्याकडून प्राधान्याने घेतली जाते.’’
यावेळी डॉ. अखिलेश ढगे यांनी बिबट्याची जीवनशैली चित्रफितीद्वारे सादर केली. त्यामध्ये बिबट नर व मादीची वागणूक, बिबट्याचे पाऊल खुणा, बिबट्याचा हल्ला करण्याची पद्धत, मादीची प्रजनन क्षमता त्याचा कालावधी, बिबटे बछडे वयानुसार त्यांची वाढ, वजन, आहार याविषयी सविस्तर माहिती दिली.’’
जुन्नर वन विभागात १९० बिबटे
जुन्नर वन विभाग अंतर्गत आंबेगाव, खेड, जुन्नर व शिरूर हे चार तालुके येतात. या भागात मोठ्या प्रमाणात ऊस क्षेत्र आहे. बिबट्यांना लपण, पाणी व भक्ष्यासाठी प्राणी या भागात सहज उपलब्ध होतात. त्यामुळे बिबट्यांची संख्या देशात सर्वाधिक या भागात आहे. बिबट वावर असलेली संख्या : आंबेगाव तालुका : ५०. शिरूर तालुका : ५०, जुन्नर तालुका : ६०, खेड तालुका : ३०. याव्यतिरिक्त माणिक डोह (ता. जुन्नर) येथील बिबट निवारण केंद्रामध्ये ३७ बिबटे आहेत.