मंचरमध्ये राष्ट्रवादी सत्ता, 
पण एक जागा गमावली!

मंचरमध्ये राष्ट्रवादी सत्ता, पण एक जागा गमावली!

मंचर, ता. २९ : मंचर (ता. आंबेगाव) कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकीत माजी गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांच्या नेतृत्वाखाली महाविकास आघाडीने तीन जागा बिनविरोध जिंकल्या, तर उर्वरित अन्य १५ जागांसाठी झालेल्या निवडणुकीत त्यांच्या पॅनेलने चौदा जागा जिंकून शिवसेना, भाजप, स्वाभिमानी शेतकरी संघटना यांच्या पॅनेलचे पानिपत केले. मात्र, राष्ट्रवादी काँग्रेसचे बंडखोर नेते देवदत्त निकम हे एकमेव विजयी झाले. पण, त्यांच्या पॅनेलमधील सर्व उमेदवारांचा पराभव झाला.
दिलीप वळसे पाटील यांच्या नेतृत्वाखाली राष्ट्रवादी कॉंग्रेस, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे व काँग्रेस यांची महाविकास आघाडी निवडणुकीला सामोरे गेली. तर, शिवसेना, भाजप व स्वाभिमानी शेतकरी संघटना यांनी एक पॅनेल केला होता. त्यांचा सर्व जागांवर पराभव झाला. तसेच, राष्ट्रवादीचे बंडखोर यांच्या पॅनेलमध्ये एकूण सात उमेदवार होते. त्यातील निकम वगळता राष्ट्रवादी कॉंग्रेसचे तालुका कार्याध्यक्ष बाळासाहेब बाणखेले यांच्यासह सर्वांचा पराभव झाला.
ठाकरे शिवसेना पक्षाचे जिल्हाप्रमुख सुरेश भोर, कॉंग्रेसचे तालुकाध्यक्ष राजू इनामदार, शरद बँकेचे अध्यक्ष देवेंद्र शहा, बाळासाहेब बेंडे, विष्णू हिंगे, विवेक वळसे पाटील, सुभाष मोरमारे, प्रदीप वळसे पाटील, रमेश खिलारी, प्रकाश घोलप, संतोष भोर आदी कार्यकर्त्यांनी महाविकास आघाडीच्या निवडणुकीची मोर्चे बांधणी केली होती. प्रथमच ठाकरे पक्षाला मयूरी भोर यांच्या माध्यमातून बाजार समितीत प्रवेश मिळाला.
प्रभारी तहसीलदार ए. व्ही. गवारी, नायब तहसीलदार डॉ. सचिन वाघ यांच्या उपस्थितीत निवडणूक निर्णय अधिकारी पी. एस. रोकडे यांनी निवडणूक निकाल जाहीर केला. त्यानंतर सर्व विजयी उमेदवार बाहेर पडल्यानंतर महाविकास आघाडीच्या कार्यकर्त्यांनी दिलीप वळसे पाटील यांच्या; तर निकम यांच्या समर्थकांनी देवदत्त निकम जिंदाबादच्या घोषणा देवून भंडाराची उधळण करून जल्लोष साजरा केला. निकम यांच्या विजयी मिरवणुकीत शिवसेना, भाजप व स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते सहभागी होते. देवदत्त निकम हे डिंभे, घोडेगाव, मंचर या तीन मतदान केंद्रावर पिछाडीवर होते. पण, निरगुडसर मतदान केंद्रात त्यांनी जोरदार मुसंडी मारून विजयाचा झेंडा फडकविला. उद्योजक किसनराव उंडे, दौलत भोर यांच्यासह अनेक कार्यकर्त्यांनी त्यांची प्रचार यंत्रणा समर्थपणे सांभाळली होती.

गटनिहाय विजयी उमेदवार
कृषी पतसंस्था व बहुउद्देशीय सहकारी संस्था- सर्वसाधारण : सचिन पानसरे, शिवाजीराव ढोबळे, रामचंद्र गावडे, संदीप थोरात, वसंत भालेराव, गणेश वायाळ व देवदत्त निकम. महिला प्रतिनिधी- रत्ना विकास गाडे, मयूरी नामदेव भोर. इतर मागास प्रवर्ग- जयसिंग थोरात. अनुसूचित जमाती- सखाराम गभाले. ग्रामपंचायत मतदार संघ- नीलेश थोरात, सोमनाथ काळे. अनुसूचित जाती-जमाती- संदीप चपटे. आर्थिकदृष्ट्या दुर्बल- अरुण बांगर. लक्ष्मण बाणखेले, राजेंद्र भंडारी व सुनील खानदेशे हे बिनविरोध विजयी झाले.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com